लोकसभा निवडणुकीसाठी ‘आप’चा जाहीरनामा

0

 वीज, शिक्षण, मोहल्ला क्लिनीक, अग्निवीर योजना बंद, दिल्लीला विशेष दर्जासह दिल्या १० गॅरंटी

 

 

नवी दिल्ली(New Delhi), १२ मे : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी आज, रविवारी आम आदमी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये २४ तास वीज, उच्च दर्जाचं शिक्षण, मोहल्ला क्लिनीक, अग्निवीर योजना बंद, दिल्लीला विशेष दर्जा, सैन्य दलास स्वतंत्रता, स्वामीनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांना हमीभाव, अशा १० घोषणा केल्या आहेत.

 

केजरीवाल यांना न्यायालयाने नुकताच अंतरिम जामीन मंजूर केल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर आले. तुरुंगाबाहेर येताच त्यांनी भाजप आणि केंद्र सरकावर हल्लाबोल सुरू केला आहे. दरम्यान आज पत्रकार परिषद घेऊन केजरीवाल यांनी आपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात देशात इंडी आघाडीचे सरकार सत्तेवर आले तर पुढील गोष्टी राबवल्या जातील, असे जाहीर केले. यावेळी आपचे नेते तथा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

‘या’ आहेत १० गॅरंटी

१. सर्वप्रथम देशवासीयांना २४ तास वीज देण्यात येईल. गरिबांना २०० युनिट वीज मोफत दिली जाईल.

२. सरकारी शाळांमधून खासगी शाळांपेक्षा उच्च दर्जाचं शिक्षण देण्यात येईल. त्यासाठी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून ५ लाख कोटी रुपयांचा खर्च देण्यात येईल. देशातील १८ कोटी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल.

३. देशातील रुग्णालयांची परिस्थिती सुधारणार असून मोहल्ला क्लिनीक प्रत्येक गावात, शहरात सुरू करण्यात येतील. या मोहल्ला क्लिनीकमधून नागरिकांवर मोफत उपचार केले जातील.

४. राष्ट्र सर्वोपरी ही आमची चौथी गॅरंटी आहे. चीनने आमच्या जमिनीवर ताबा घेतला आहे, पण केंद्र सरकार ते मान्य करत नाही. त्यामुळे, सैन्य दलास स्वतंत्रता देण्यात येईल, त्यासोबतच डिप्लोमेटीक मार्गानेही ती जमीन परत मिळवण्यात येईल.

५. अग्निवीर योजना बंद करुन सैन्य दलातील भरती कायम केली जाईल. अग्निवीर भरती करण्यात आलेल्या सैन्य दलातील जवानांना नोकरीत कायम केले जाईल. देशाच्या सैन्य दलास ताकद देण्याचं काम आमचं सरकार करेल.

६. शेतकरी भीक मागत नाही, त्यांचा हक्क मागतोय. त्यामुळे, स्वामीनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांना हमीभाव देण्यात येईल, त्यांच्या पिकांना योग्य दर देण्यात येईल.

७. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला पूर्ण दर्जा दिला जाईल.

८. देशातील बेरोजगारीसाठी बारकाईने नियोजन केले आहे, त्यानुसार दरवर्षी २ कोटी नोकऱ्या , दिल्या जातील.

९. भाजपाच्या वॉशिंग मशिनला तोडण्याचं काम करणार, प्रामाणिक लोकांना तुरुंगात टाकण्याचं आणि भ्रष्टाचारी लोकांना संरक्षण देण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे, आमचं सरकार आल्यास भाजपाचं वॉशिंग मशिन तोडण्याचं काम आम्ही करू.

१०. देशातील व्यापाऱ्यांसाठी धोरणं आखण्यात येतील. गेल्या १० वर्षात १२ लाख श्रीमंत लोक व्यापार-उद्योग बंद करुन विदेशात गेले आहेत. त्यामुळे, जीएसटी बाहेर करण्यात येईल. जीएसटी सुरळीत केलं जाईल. अशी व्यवस्था निर्माण केली जाईल, जी व्यापाऱ्यांना जास्त परवानग्यांची गरज असणार नाही. चीनला उद्योग-व्यापारात मागे टाकण्याचं काम आपणास करायचं आहे.