मायावतींच्या निर्णयामुळे राजकीय समीकरणे प्रभावित

0

आकाश आनंदला राष्ट्रीय समन्वयक पदाहून हटवले

लखनऊ(Lucknow), 08 मे  बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती(Mayawati) यांनी त्यांचा भाचा आकाश आनंद याची मंगळवारी 7 मे रोजी पक्षाच्या समन्वयक पदाहून हकालपट्टी केली. तसेच आकाशचे वडील आनंद कुमार यांना सर्व कारभार सोपवला. त्यामुळे आकाश आनंद(Aakash aanand) आता बसपातील उत्तराधिकारी राहिलेले नाही. त्यामुळे उत्तरप्रदेशच्या राजकारणातील समीकरणे प्रभावित झाल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलेय.

उत्तरप्रदेशातील मागासवर्गीयांच्या राजकारणात चंद्रशेखर (रावण) हे प्रभावी तरुण नेते मानले जातात. चंद्रशेख यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. प्रियंका गांधींचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. चंद्रशेखर यांच्या राजकारणातील उदयामुळे दलित समाजाचे राजकारण करणाऱ्या मायावती सर्वाधिक प्रभावित झाल्या होत्या. त्यामुळे मायावती यांनी राजकीय वारस म्हणून आपला भाचा आकाश आनंद याचे नाव पुढे केले.आकाश आनंद यांनी लंडनमधून एमबीएचे शिक्षण घेतले असून त्यांचे लग्न बसपा नेते अशोक सिद्धार्थ यांची मुलगी डॉ. प्रज्ञा हिच्याशी झालेय. उत्तराधिकारी घोषित होण्यापूर्वी 2017 मध्ये आकाश आनंद सहारनपूरमध्ये एका जाहीर सभेत मायावतींसोबत दिसला होता. त्यानंतर ते सातत्याने पक्षाचे काम करत होते. त्यानंतर 10 डिसेंबर 2019 मध्ये त्यांना राष्ट्रीय समन्वयक बनवण्यात आले. लोकसभा निवडणुकीनंतर सपा आणि बसपा यांची युती तुटल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तर 2022 च्या हिमाचल विधानसभा निवडणुकीतील स्टार प्रचारकांच्या यादीत आकाश आनंद यांचे नाव पहिल्यांदाच आले होते. तसंच यंदाच्या निवडणुकीतही ते सक्रीयपणे बीएसपीसाठी सभा घेत होते. त्यामुळे आकाश आनंद यांची हकालपट्टी राजकीय वर्तुळात आश्चर्याचा विषय ठरतेय.

बसपाच्या अंतर्गत सूत्रांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, मायावती यांची स्वतःची राजकीय शैली असल्यामुळे त्यांनी स्वतःला विरोधकांच्या आघाडीपासून दूर ठेवले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून आकाश आनंद यांची भाषा अतिशय प्रखर होत चालली होती. तसेच त्यांनी इंडि आघाडीच्या नेत्यांशी संधान साधणे सुरू केले होते. त्यामुळे मायावती यांनी आकाश आनंदला हटवल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.