प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील- शरद पवार

0

नवी दिल्ली(New Delhi), 08 मे देशातील प्रादेशिक निकट भविष्यात काँग्रेससोबत समन्वयाने काम करतील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला. एका मुलाखतीदरम्यान बोलताना पवार यांनी ही शक्यता बोलून दाखवली.

आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा अंदाज शरद पवार(Sharad Pawar) यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार यांच्या या अंदाजामुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र याबाबत देखील शरद पवार यांनी खुलासा केला आहे. सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. आमच्या पक्षाबाबत कोणतेही पाऊल उचलताना किंवा रणनीती ठरवताना सामूहिक पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असे देखील शरद पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार हे एनडीएमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव देखील अजित पवार यांना मिळाले आहे. त्यानंतर शरद पवार देखील भाजप सोबत जातील का ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, शरद पवार यांनी भाजप सोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणे किंवा त्यांचे विचार पचणी पडणे हे आमच्यासाठी अवघड असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.