पंतप्रधानांनी बजावला मतदानाचा हक्क

0

अहमदाबाद(Ahmedabad), 07 मे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज, मंगळवारी 11 राज्यांमधील लोकसभेच्या 93 जागांवर मतदान होत आहे. यात गुजरातच्या 25, उत्तर प्रदेशातील 10, महाराष्ट्रातील11 आणि कर्नाटकातील 14 जागांचा समावेश आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादच्या निशान उच्च माध्यमिक विद्यालयात मतदान केले. तिसऱ्या टप्प्यात मतदान केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मतदान केंद्राबाहेर येऊन मुलांसोबत मस्ती केली. तसेच नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) देखील उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनी लोकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. आपल्या देशात दानधर्माचे खूप महत्त्व आहे. त्याच भावनेने देशवासीयांनी मतदान करावे. आज तिसऱ्या टप्प्यात आणखी तीन आठवडे मतदान सुरू राहील. पंतप्रधान म्हणाले की, “मी कालच आंध्र प्रदेशातून आलो आहे. इथून मला मध्यप्रदेशात जायचे आहे. मला महाराष्ट्रात जायचे आहे आणि त्यानंतर मला पुढे जायचे आहे. त्यामुळे मला फारसे बोलता येणार नाही. पण मी या दिवशी मतदान करणाऱ्यांना अभिवादन करा असे मोदी म्हणालेत. भारत हा सर्वात मोठा लोकशाही देश असून इथली निवडणूक प्रक्रिया आणि व्यवस्थापन हे जगाने शिकण्यासारखे आहे. जगातील विद्यापीठांनी यावर केस स्टडी करायला हवी. यावर्षी केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात लोकशाहीचा उत्सव आहे. यासाठी निवडणूक आयोग खूप अभिनंदनास पात्र आहे. माध्यमेही निवडणुकीच्या रंगात पूर्णपणे रंगून जातात. याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी पत्रकारांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पीएम मोदी म्हणाले की, दिवस-रात्र धावणाऱ्या पत्रकारांनी आपल्या तब्येतीचीही काळजी घ्यावी. मीडियामध्ये स्पर्धा इतकी आहे की, तुम्हाला वेळेच्या पुढे धावावे लागेल. मी माझ्या जुन्या सहकाऱ्यांना एवढेच आवाहन करेन की, त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. भरपूर पाणी प्यावे यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल आणि ऊर्जा देखील टिकून राहील असे पंतप्रधानांनी सांगितले.