अजित पारसेची इन कॅमेरा चौकशी!

0

हायकोर्टाच्या आदेशाने शक्यता बळावली : पोलिसांना 20 फेब्रुवारीपर्यंत व्हिडीओ सादर करण्याचे आदेश

नागपूर. दीर्घ काळापासून पोलिसांना चकमा देत असलेला फसवणूक प्रकरणांमधील आरोपी अजित पारसे (Accused Ajit Parse ) याची आता इन कॅमेरा चौकशी (In camera interrogation ) होण्याची शक्यता आहे. अजित पारसेची कॅमेरा समक्ष चौकशी करून त्याचा व्हिडीओ येत्या २० फेब्रुवारीपर्यत न्यायालयात सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. यामुळे दवाखान्यात भरती होऊन चौकशीचा ससेमीरा टाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या पारसे भोवतीचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. पारसेची कॅमेऱ्यासमोर चौकशी करून त्याचा व्हिडिओ तयार करण्याचे आदेश हायकोर्टाने पोलिसांना दिले आहेत. प्रत्यक्षात पारसेची चौकशी करण्यासाठी पोलिस रुग्णालयात गेले होते, मात्र पारसेने अजिबात सहकार्य केले नाही, असे तपास अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात सांगितले. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्याने उत्तर दिले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारसे याला कोणत्याही गंभीर आजाराने ग्रासलेले नसून, तो केवळ पायात आणि पोटात दुखत असल्याची तक्रार करत आहे. त्यावर उच्च न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांना पारसेला विचारायचे आहे त्याची प्रश्नावली तयार करण्याचे आदेश दिले. ही प्रश्नावली थेट पारसेकडे सोपवा किंवा त्यांच्या वकिलामार्फत पाठवा. पारसेला २० फेब्रुवारीपूर्वी पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्याची प्रतही उच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने पारसेच्या डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती मागवली होती. डॉक्टरांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, पारसे याला पोटाच्या काही किरकोळ समस्या होत्या. त्यात ३ दिवसांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही. गेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी पारसेने आजारपणाचे कारण सांगून चौकशी टाळण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यानंतर उच्च न्यायालयाने पोलिसांना रुग्णालयात जाऊन पारसेची चौकशी करण्याची परवानगी दिली. विशेष म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे आमिष दाखवून शहरातील एका डॉक्टरची ४ कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप पारसेवर आहे. याशिवाय पारसेने अनेकांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा