पराभव जिव्हारी, श्रीलंकेचे क्रिकेट मंडळच बरखास्त!

0

कोलंबो : क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाकडून लाजिरवाणा पराभव श्रीलंकेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. (India vs Sri Lanka) या पराभवानंतर श्रीलंकेने आपले अख्खे क्रिकेट मंडळ बरखास्त केले आहे. श्रीलंकेचे क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. भारताविरुद्ध तब्बल ३०२ धावांनी पराभव व त्यातच विश्वचषकातून बाहेर पडल्याने श्रीलंकंन प्रशासनाने हे पाऊल उचलले.
सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने विश्वचषकात अतिशय निराशाजनक कामगिरी केली. आतापर्यंत खेळलेल्या 7 सामन्यात श्रीलंकेने केवळ 2 विजय मिळवले आहेत. श्रीलंकेच्या या वाईट कामगिरीमुळे त्यांच्या देशात निदर्शने सुरु झाली आहेत. श्रीलंकेच्या क्रीडा मंत्रालयाने याबाबत निवड समितीला जाब विचारला होता, पण आता त्यापुढे जाऊन थेट क्रिकेट मंडळच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. क्रीडामंत्री रोशन रणसिंघे यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्ड हा देशद्रोही आणि भ्रष्ट आहे असल्याची कठोर टीका केली. मंडळाच्या सदस्यांकडे राजीनामे मागितले होते. दरम्यान, मंडळ बरखास्त केल्यावर क्रीडा मंत्रालयाने विश्वविजेत्या श्रीलंका संघाचा माजी कर्णधार अर्जुना रणतुंगा (Arjuna Ranatunga)याच्या अध्यक्षतेखाली एक अंतरिम समिती नियुक्त केली आहे. या सात सदस्य समितीमध्ये अर्जुन रणतुंगा यांच्यासोबत सर्वोच्च न्यायालयातील दोन न्यायमूर्ती आहेत.