ईडीची आणखी एका नेत्यावर कारवाई!

0

 

(Mumbai)मुंबई : ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून अटक करण्यात आलीय. त कोविडकाळात झालेल्या खिचडी घोटाळा प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप चव्हाण यांच्यावर आहे. (ED Arrest Suraj Chavan) चव्हाण यांना झालेली अटक हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबईत कोव्हिड काळात स्थलांतरीत मजुरांना खिडची वाटपाचा निर्णय हा तत्कालिन ठाकरे सरकारने घेतला होता. यासाठी विविध कंपन्यांना कंत्राटे देण्यात आली होती. यातील एका कंपनीत सूरज चव्हाण यांच सहभाग होता. करोना काळात वाटप करण्यासाठीच्या खिचडीचा दर्जा आणि त्याचे प्रमाण घटवून यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. चव्हाण यांना काल बुधवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आज त्यांचा रिमांड घेण्यात येणार आहे.

सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. आदित्य ठाकरे यांनी सूरज चव्हाण यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये आदित्य ठाकरेंनी सूरज चव्हाण यांचा अभिमान वाटत असल्याचे नमूद केले आहे. “निर्लज्ज हुकूमशाही आणि त्यांच्या यंत्रणेसमोर न झुकणाऱ्या अशा निष्ठावान व्यक्तीचा सहकारी असण्याचा मला अभिमान आहे. सूरज चव्हाण हे कायमच सत्य, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आपल्या राज्यघटनेसाठी उभे राहिले आहेत. सत्तेकडून आलेले प्रलोभनांचे प्रस्ताव त्यांनी धुडकावून लावले. त्यामुळेच त्यांना अशा प्रकारे त्रास दिला जात आहे”, असे आदित्य ठाकरेंनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.