(Ratnagiri)रत्नागिरी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे रत्नागिरीचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर गुरुवारी सकाळी छापेमारी केली. एसीबीच्या ३ पथकांच्या माध्यमातून ही कारवाई येत आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिल्यामुळे आपल्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप साळवी यांनी केला आहे. मी कायमस्वरुपी उद्धव ठाकरेंसोबत राहणार आहे. राजकीय सुडातून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. (Rajan Salvi ACB Enquiry)
साळवी यांच्या घरी एसीबीकडून झाडाझडती सुरु आहे. यापूर्वी एसीबीने त्यांची चौकशी केली आहे. नेमक्या कोणत्या प्रकरणात त्यांची चौकशी सुरु आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान, या कारवाईवर बोलताना साळवी यांनी सांगितले की, मी सर्व अधिकाऱ्यांचं स्वागत केले आहे. कारण मला हे अपेक्षित होते. ज्या दिवशी मला एसीबीकडून पहिली नोटीस मिळाली आणि मला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आले, त्याच दिवशी मला परिस्थितीची कल्पना आली होती. त्यांना जे काही सहकार्य लागेल, ते संपूर्ण सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले. साळवी म्हणाले की, मला अटक झाली तरी चालेल, अटक, जेल हे सर्व मला काही नवीन नाही. राजन साळवी काय आहे हे माझ्या कुटुंबाला, माझ्या जनतेला माहिती आहे, असेही त्यांनी सोशल मिडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.