Home Artical Blog कळमेश्वर येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजनेचा भव्य शुभारंभ

कळमेश्वर येथे मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजनेचा भव्य शुभारंभ

0
* आमदार डॉ आशिषराव देशमुख व नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ.
* या योजनेचा शुभारंभ करणारे सावनेर-कळमेश्वर हे संपूर्ण नागपूर जिह्यातील पहिले विधानसभा क्षेत्र.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजनेचा भव्य शुभारंभ सोहळा आज कळमेश्वर येथील संत्रा मार्केट परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. या योजनेचा शुभारंभ करणारे सावनेर-कळमेश्वर हे संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील पहिले विधानसभा क्षेत्र आहे. ही महत्वाकांक्षी योजना म्हणजे सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे.

या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ आशिषराव देशमुख व नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शुभहस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. 2025 -26 या वर्षामध्ये सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण 91 पाणंद रस्ते मंजूर झाले आहे. त्याची किंमत 9 करोड 12 लक्ष इतकी आहे.

शेत / पाणंद रस्त्यांचा प्रश्न हा ग्रामीण भागासाठी व शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे, आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व आमदारांच्या वतीने मागणी केली होती की, तालुकास्तरीय पाणंद रस्ते समिती नेमावी व काम उत्कृष्ट होण्यासाठी तसेच त्यावर देखरेख ठेवण्याकरीता आमदार त्या समितीचा अध्यक्ष असावा. त्यांची ही मागणी पूर्ण झाली असून शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना आणली आहे.

मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना असून, या अंतर्गत शेतापर्यंत पक्के रस्ते तयार करून शेतीमालाची वाहतूक सुलभ करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते उपलब्ध होतील. तसेच शेतातील मालाची वाहतूक सुलभ होऊन वेळ व खर्चाची बचत होणार आहे. शेतकऱ्यांना पावसाळ्यात त्रास होणार नाही. गावांतील अंतर्गत शेतरस्ते एकमेकांशी जोडले गेल्यामुळे शेतीचे यांत्रिकीकरण वाढण्यास देखील मदत होणार आहे, असे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी यावेळी सांगितले.
सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा देत ते पुढे म्हणाले की, प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीला जाणारे पाणंद रस्ते 5 वर्षात पूर्ण करू. मी सुद्धा शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे रस्त्यांची दुर्गती पाहीली आहे. मी काटोलचा आमदार असताना जास्तीत जास्त निधी पाणंद रस्त्याना दिला, जलयुक्त शिवार व्यवस्थित राबविले. यावेळी सावनेर-कळमेश्वरची सेवा करण्याची संधी जनतेनी दिली. विधानसभेमध्ये मी याविषयी आवाज उठवला आणि पाणंद रस्त्यांविषयी पुढाकार घेतला. आज त्यासाठी 9 कोटी मंजूर झाले आहेत. शेतकऱ्यांना रात्रीबेरात्री, पावसाळात दळणवळण सोयीचे होईल, शेतकऱ्यांचाच्या जमिनीची किमंत वाढेल, शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे शेतीउपयोगी यंत्रे, शेतकऱ्यांचा मलाला फायदेशीर ठरेलं. ही सर्व कामे चांगल्या दर्जाची झाली पाहिजे, नाही तर आमदार म्हणून मी कोणाचीही गय करणार नाही, अशी ताकीद त्यांनी दिली.जमिनीमध्ये पाण्याची पातळी खोलवर जात आहे, ती पातळी वर आण्यासाठी पाणंद रस्ताला लागणारा मुरूम तलाव खोलीकरण करून, नदीखोलीकरण करून आणावा जेणेकरून पाणंद रस्ते व जलसंधारणचे सुद्धा काम होईल. हवामान बदलामुळे दुष्काळसारखी परिस्थिती येऊ शकते त्यावर उपाय म्हूणन पाणंद रस्त्याच्या दुतर्फ वृक्ष लागवड करत आहे. आमदार निधीमधून 10 टक्के निधी वृक्ष लागवडीकरिता देत आहे आणि काही निधी पालकमंत्री महोदयांकडून घेणार आहे. वृक्ष लागवड झाल्यावर गावातील ग्रामपंचायत, लोकांनी झाडांची निगा राखून पर्यावरणाचे रक्षन करावे.

यावेळी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देखील या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.

याप्रसंगी सर्व शेतकरी आनंदी दिसत होते. याप्रसंगी डॉ राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, अशोक धोटे, नगराध्यक्ष अविनाश माकोडे, धनराज देवके, प्रिया मानकर आदी उपस्थित होते.