उन्हापासून बचाव करणाऱ्या साहित्यांची दुकाने सजली

0

 

खरेदीसाठी गर्दी

विविध रंगी आकर्षक टोप्या, दुपट्ट्याच्या विक्रीत वाढ

अमरावती (Amravti), 8 एप्रिल  उन्हापासून संरक्षणासाठी विविध रंगी व आकर्षक टोप्या, दुपट्टे विक्रीसाठी बाजारात आले आहे. वाढत्या उन्हामुळे बाजारपेठेत टोप्या व दुपट्ट्यांच्या विक्रीत आता चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे.

त्यामुळे विक्रेत्यांनीही विविध अभिनेत्यांच्या नावाच्या टोप्या विक्रीसाठी आणल्या आहेत. काही खेळाडूंची नावे असलेल्या टोप्याही विक्रीसाठी आल्या आहेत. या टोप्या खरेदीसाठी तरुणांची गर्दी वाढत आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस पारा भडकल्याने टोप्या व दुपट्ट्यांच्या विक्रीत अचानक वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी सर्वच विविध उपाय शोधू लागले आहेत. नागरिक, तरुण, तरुणींना कामानिमित्त बाहेर पडावेच लागते. अशात उन्हापासून संरक्षणासाठी डोक्यात टोपी घालणे दुपट्टा बांधणे सुरू झाले आहे. परिणामी

टोप्या, कापडी रूमाल, दुपट्टा खरेदीसाठी गर्दी होत आहे. मार्च महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढल्याने आता उष्णता जास्तच जाणवत आहे. त्यामुळेच टोपी, दुपट्टा विक्रीची दुकाने शहरातील चौकाचौकांत लागली आहे. त्यात महिला व तरुणींसाठी स्कार्फही बाजारात आले आहे. कापडी, जिन्स, लेदर तसेच चायना मेड टोपींची मागणी अधिक आहे. एप्रिलच्या वाढत्या उन्हामुळे या वस्तूंच्या विक्रीने आता जोर पकडला आहे.

सकाळपासूनच उन्हाचे चटके

■ यंदा उन्हाळा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जाणवू लागला आहे. सकाळी ८ वाजेपासूनच उन्हाचे चटके बसायला सुरुवात होत आहे. दुपारी तर अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे वाढत्या तापमानापासून संरक्षण व्हावे, यासाठी नागरिक टोपी, कापडी दुपट्टा बांधूनच घराबाहेर पडताना दिसत आहे.