नागपूर : नागपूर शिक्षक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूकीची मतमोजणी अजनीत कडक पोलिस बंदोबस्तात सुरू झाली असून तिहेरी लढतीत 86 टक्क्यांवर झालेल्या मतदानाने चुरस वाढविली आहे. निकाल लागण्यास उशीर होणार आहे. विद्यमान आमदार नागो गाणार या मतदारसंघात विजयाची हॅट्ट्रिक करतात की मविआचे सुधाकर अडबाले , शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे चमत्कार घडवून आणतात याचा निकाल दुपारपर्यंत महत्वाचे कल लक्षात घेता लागणार आहे. अजनी येथील सामुदायीक भवनात प्रारंभिक मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. यावेळी केंद्राबाहेर येणाऱ्यांकडून राजकीय नेते, कार्यकर्ते अदमास घेताना दिसले.
निवडणूक निरिक्षक अरूण उन्हाळे, निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यावेळी उपस्थित होते. प्रारंभिक मतमोजणी प्रक्रियेनंतर एक हजारांच्या गठ्ठ्यांची सरमिसळ प्रक्रिया सुरू असून त्यानंतर वैध व अवैध आणि प्रथम पसंतीच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल. पसंती क्रमानुसार ही मतमोजणी असल्याने रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे हे विशेष. 36 हजारावर मतदान आणि 22 उमेदवारांचे नशिबाचा यातून निकाल लागणार आहे.