नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघात सोमवारी 30 जानेवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या कालावधीत मतदान होणार असून, २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारतोफा शनिवारी सायंकाळी शांत झाल्या.एकंदर 22 उमेदवार या रिंगणात असलेत तरी तीन प्रमुख उमेदवारांमध्ये ही लढत होत आहे. 39 हजारावर मतदार असून नागपूर जिल्ह्यातील 16 हजार मतदार यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शांततेने ही निवडणूक प्रक्रिया राबवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा साहायक निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. मतदानाकरिता रविवारी (ता. २९ जानेवारी) अजनी येथील सामुदायिक भवन येथून पोलिंग पार्ट्या रवाना झाल्या. सकाळी आठ वाजल्यापासून जिल्हय़ातील ४३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेमध्ये जवळपास अडीचशे कर्मचारी जिल्हय़ात कार्यरत आहेत. अजनी रेल्वे स्थानकाजवळील सामुदायिक भवन या ठिकाणी सुरक्षा भवन (स्ट्राँग रूम ) उभारण्यात आले असून, ३0 तारखेला मतपेट्या जमा होतील. २ फेब्रुवारीला याच ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.
काँग्रेस-भाजपसाठी प्रतिष्ठेची लढत
ही जागा कोणत्याही परिस्थितीत राखण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ताकदीने प्रचारात उतरल्याचे दिसून आले. तर कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन घडविण्याचा निर्धार करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांनी शक्ती पणाला लावली. मात्र, सेनेचा उमेदवार बदलणे, पाठींब्यावरून झालेल्या राजकीय घडामोडी पाहू जाता मविआत एकजूट पहायला मिळाली नसल्याने निकालाबाबतही अनिश्चितता आहे. जुनी पेन्शनचा विषय या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरला आहे.
भाजपने शिक्षक परिषदेचे विद्यमान आमदार नागो गाणार यांना उशिरा सर्मथन दिले. महाविकास आघाडीतही नागपूरच्या जागेवरून ओढाताण झाली. शेवटी ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली. यामुळेच नागो गाणार ही जागा तिसऱ्यांदा जिंकतात की मविआचे सुधाकर अडबाले, शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे यांच्यापैकी कुणी बाजी मारतो हे निकालात, दुसऱ्या पसंती क्रमातूनच उघड होणार आहे.