पाणी पुरवठा करणारी योजना बंद

0

 

गोंदिया (Gondia)- गोंदिया जिल्ह्यातील बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यातील 48 गावांना पाणीपुरवठा केला जातो. या योजनेचा एक कोटी रुपयांच्या वर वीज बिलचा भरणा न केल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. यामुळे या 48 गावांचा पाणीपुरवठा बुधवारपासून मागील 5 दिवसांपासून ठप्प करण्यात आला आहे.

परिणामी भर उन्हाळ्यात पाणी टंचाई असताना दूषित पाणी पिण्याची वेळ या 48 गावातील नागरिकांवर आली आहे.
बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही नेहमी चर्चेत राहते. कधी वीजपुरवठा खंडित तर कधी पाइपलाइनला गळती, कधी देखभाल दुरुस्तीचे कंपनीला पैसे दिले नाही, अशा विविध कारणांनी बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद राहते. या योजनेला अविरत सुरू ठेवण्यासाठी मोजक्याच लोकांचा आटापीटा असतो. त्यातच या योजनेचे शुद्ध पाणी घेणारे नळ कनेक्शनधारक उदासीन आहेत.

शुद्ध पाणी वापरतात, परंतु पाण्याचे बिल देण्यासाठी नळ कनेक्शनधारक धजावत नाही. परिणामी 48 गावांवर एक कोटीच्या वर पाणीपट्टी कर थकीत आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नागरिकांना शुद्ध पाणी पिण्याची सवय लागली आहे, आणि भर उन्हाळ्यात प्राधिकरणाने पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे, त्यामुळे 48 गावांमध्ये सुद्ध पाणी पिण्यासाठी तारांबळ उडाली आहे.

शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने या 48 गावांतील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र जावे लागत आहे. कदाचित या दूषित पाण्यामुळे आरोग्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तरी ही पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी आता या 48 गावांतील नागरिकांकडून होत आहे.