कुणबी प्रमाणपत्रासाठी ‘सगेसोयरे’ म्हणजे कोण?

0

 

अध्यादेशात आणली स्पष्टता

(Mumbai)मुंबई : मराठा आरक्षणाची ( Maratha Reservation Agitation) मनोज जरांगे यांनी सुरु केलेली मोठी लढाई त्यांनी जिंकली. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. या मागण्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्रासाठी सर्वाधिक काथ्याकूट ज्या ‘सगेसोयरे’ शब्दावरुन झाला होता, त्याबाबतही राज्य सरकारने अध्यादेशाच्या माध्यमातून स्पष्टता आणली आहे. राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार, ‘सगेसोयरे’ या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यांमधील जातीमध्ये झालेल्या लग्न नातेसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल.

कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भाव-भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पध्दतीतील सगेसोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगेसोयरे आहेत, अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल, असे अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तच्या नातेसंबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम, 2012 नुसार तपासून त्यांनाही तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीननुसार, ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सग्यासोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोदीचा आधार घेऊनच कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सग्यासोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल. मात्र, या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये, म्हणून सदर विवाह सजातीय आहे, यासंदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे, हे देखील आवश्यक असेल व याची पुर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जातप्रमाणपत्र देता येतील.