अखेर अध्यादेश निघाला, मराठा आंदोलनास मोठे यश!

0

(New Mumbai)नवी मुंबई : मराठा समाजाच्या आंदोलनास मोठे यश आले आहे. रात्री उशीरा राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने पुन्हा एकदा मनोज जरांगे यांची भेट घेऊन सुधारित अध्यादेश त्यांच्या सुपूर्द केला. (Maratha Reservation Agitation) मागण्या मान्य झाल्यानंतर (Manoj Jarange)मनोज जरांगे रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेऊन त्यात सर्व मागण्या मान्य झाल्याची माहिती मराठा बांधवांना दिली. सर्व मागण्यांचे अध्यादेशही निघाल्याचे त्यांनी सांगितले. कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्रे द्यावी तसेच त्यांच्या कुटुंबानासुद्धा प्रमाणपत्र द्यावे, ही मागणी मान्य झाली आहे. सरकारने सगेसोयऱ्यांबद्दलही अध्यादेश काढला आहे.

त्याचप्रमाणे आंतरवली सराटीत मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, तेसुद्धा मागे घेण्याचे आदेश (Chief Minister Eknath Shinde)मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याचे जरांगे यांनी सांगितले. त्यामुळे आता आंदोलन मागे घेण्यात आले आहे. शनिवारी जरांगे हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिणार असून आंदोलनाची सांगता करणार आहेत.

मनोज जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. त्यांनी आमची विनंती मान्य केली आहे. त्यांचे पत्र आम्ही स्वीकारू. जरांगे पुढे म्हणाले की, आज मी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिणार आहे. समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे. उद्या सकाळी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री पत्र घेऊन येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, उद्या आम्ही येथे सभा घेणार असून मुंबईत जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जरांगे यांनी सांगितले की, वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे. आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार आहे. तसेच विधानसभेत यावर कायदा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणचे काम केले आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले.