वर्धेत कमळ फुलणार की तुतारी वाजणार?

0

वर्धा लोकसभा मतदारसंघ

नागपूर (Nagpur): (शंखनाद चमू )वर्धा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ राहिला आहे. धामणगाव, मोर्शी, आर्वी, देवळी, हिंगणघाट, वर्धा अशा वर्धा जिल्ह्यातील चार आणि अमरावती जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश असलेल्या वर्धा लोकसभा मतदारसंघात यावेळी प्रथमच काँग्रेसच्या चिन्हावर काँग्रेसचा उमेदवार रिंगणात नाही. भाजप उमेदवार रामदास तडस यांचे नामांकन,शक्तिप्रदर्शन निमित्ताने भाजपनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कळीचा मुद्दा केला. महाविकास आघाडीत यावेळी ही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे गेली. मागील दोन निवडणुकांमध्ये येथे भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांनी विजय मिळविला. यावेळी परंपरागत मतांच्या गठ्ठा मतांवर अवलंबून असलेल्या महायुतीच्या,भाजपच्या विजयाची हॅट्ट्रिक रोखण्याचे आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आहे .
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक चळवळीचे केंद्रबिंदू राहिले. पर्यायाने बहुतांशी निवडणुकीत काँग्रेसच्याच उमेदवाराला विजय मिळाला. याशिवाय कॉम्रेड रामचंद्र घंगारे यांच्या निमित्ताने काही वेळा हा मतदारसंघ अपवादही राहिला. यावेळी प्रथमच भाजपमध्येही नाराजीचे सूर ऐकू येत आहेत. काही नेत्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखविली. तडस यांना घरातूनही विरोध झाला. सून पूजा पंकज तडस यांची उमेदवारी विविध कारणांनी चर्चेत आली, महिलांमध्ये नाराजीही दिसली. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून यावेळी काँग्रेसचे आर्वी येथील माजी आमदार अमर काळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे तुतारी चिन्हासह रिंगणात आहेत. त्यांचे नामांकन दाखल करण्यासाठी शरद पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख वर्धेत आले. बरेच दिवस हा उमेदवारीचा गुंता कायम होता. यातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचे सूरही उमटले. आता प्रचारात सर्वाना सोबत घेत महाविकास आघाडीतील नेत्यांनी आघाडी घेतली आहे. एकंदरीत या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सभांनी वातावरण निर्मिती केली. एकंदरीत आता या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार रामदास तडस, महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्यात सरळ लढत येत्या 26 एप्रिल रोजी होत आहे. पुन्हा एकदा जातीय समीकरणेदेखील उमेदवाराच्या विजयाची समीकरणे ठरविण्यावर परिणाम करण्याची शक्यता आहे. मागील दोन निवडणुकांचा आढावा घेता २०१४ मध्ये काँग्रेसकडून सागर मेघे रिंगणात होते. त्यावेळी भाजपकडून रामदास तडस उमेदवार होते. रामदास तडस यांनी विजय मिळवला. २०१९ मध्ये रामदास तडस यांना ५७८३६४ मते मिळाली तर काँग्रेसच्या चारूलता टोकस यांना ३९११७३ मते मिळाली होती. तिसर्‍या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार धनराज वंजारी यांना ३६४५२ तर चौथ्या क्रमांकावर बसपाचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांना ३६४२३ मते मिळाली होती. एकंदरीत सलग दोन वेळा भाजप उमेदवाराने काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला