पश्चिम विदर्भात मतदानाला वेग, उमेदवार काय म्हणतात ?

0

नागपूर(Nagpur):आज शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भातील पाच आणि नांदेड,हिंगोली,परभणी या मराठवाड्यातील 3 अशा एकंदर 8 लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाले. वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली.जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केली मतदान केंद्राची पाहणी केली. 16 लाख 82 हजार 771 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 1997 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या गेल्या. आज सकाळी सर्व मतदान केंद्रावर मॉक पोल प्रक्रिया पार पडली. मागील लोकसभेच्या वेळी 61.17 टक्के मतदान झाले होते. यंदा मतदान 70 टक्के पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे.

सर्व नागरिकांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. अमरावती मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 078 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यासाठी 1 हजार 983 मतदान केंद्र आहेत. अमरावतीमध्ये एकंदर 37 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, यात भाजपच्या नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखडे व प्रहारचे दिनेश बुब यांच्यात प्रामुख्याने लढत होणार आहे. अमरावती जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असून, जिल्ह्यात सर्वाधिक 354 मतदान केंद्र दुर्गम मेळघाटात आहेत.

प्रत्येक मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
बुलढाणा लोकसभेसाठी महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष एकूण 21 उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव, महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्यात तिहेरी लढत होत आहे. रविकांत तुपकर हे पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत. रविकांत तुपकर आणि त्यांची पत्नी ऍड. शर्वरी तुपकर यांनी सावळा या गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला.चटणी भाकरी खाऊन जनतेने माझा प्रचार केला. जनतेचे उपकार मी कधीही विसरणार नाही. तरुण-तरुणी, वृद्ध महिलांनी मतदानासाठी बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर आवाहन केले आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून एकूण 17 लाख 82 हजार मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून, या मतदानासाठी 1162 मतदान केंद्र आहेत.

मतदानाकरिता 11 हजार 592 अधिकारी कर्मचारी नेमण्यात आले असून, पाच हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, वर्धा मतदारसंघात मी केलेली कामे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले निर्णय आणि विकास कामांच्या भरवशावर मला 100% खात्री आहे की मी पुन्हा निवडून येईल अशी प्रतिक्रिया मतदानाचा हक्क बजावल्यानंतर महायुती उमेदवार रामदास तडस यांनी दिली. नांदेड जिल्ह्यात २०६२ मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली. सकाळीच मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याने निकालात चुरस वाढली आहे. वजीराबाद येथील महिला सखी केंद्रावर गुलाब पुष्प देऊन मतदारांचे स्वागत करण्यात आले. अकोल्यात काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील मतदानाचा हक्क बजावला. सुदृढ लोकशाहीसाठी अभय पाटील यांनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात एकूण 17 उमेदवार आहेत. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी केले. विशेष म्हणजे त्यांचे मतदान नांदेड शहरातील दक्षिण विधानसभा मतदारसंघात आहे. दुपारनंतर त्या मतदान करणार आहेत.