अमरावतीमध्ये चौरंगी लढतीत अडकल्या राणा ?

0

अमरावती लोकसभा

 

नागपूर(Nagpur): शंखनाद चमू रामटेक प्रमाणेच जात प्रमाणपत्र प्रकरणावरून बहुचर्चित अमरावती लोकसभा मतदारसंघात यावेळी निवडणूक चौरंगी होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बळवंत वानखेडे आणि महायुतीच्या उमेदवार विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्यामध्ये थेट लढत असतानाच आ बच्चू कडू यांनी दंड थोपटत प्रहारचा उमेदवार देत या दोन्ही पक्षांपुढे आव्हान उभे केले. भरीस भर म्हणून वंचितने देखील आपला उमेदवार दिला आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी ही लढत पहिल्या टप्प्यात बहुरंगी केली. महत्वाचे म्हणजे विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ,अभिजित अडसूळ यांच्या नाराजीपासून तर आता आ बच्चू कडू यांच्या आंदोलन,सभेला मैदान नाकारल्याने तीव्र नाराजीपर्यंत ही निवडणूक चर्चेत आहे. खरे म्हणायला विरोधकांची ही लढत भाजपपेक्षा नवनीत राणा यांच्या विरोधात अधिक आहे.

शिवसेना,भाजपकडून महायुतीमध्ये प्रचंड विरोध असतानाही खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आली. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून आमदार बळवंत वानखेडे रिंगणात आहेत.लढत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये होणार असतानाच प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी तिसरा पर्याय म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख दिनेश बुब यांना प्रहार कडून अमरावतीत उमेदवारी दिली. आहे. राणा यांच्यासाठी जसा हा मोठा धक्का आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी देखील धोक्याची घंटा आहे. कारण दिनेश बुब हे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे जिल्ह्यातील प्रमुख नेते आहेत. आघाडीकडे त्यांनी शिवसेनेतून उमेदवारीही मागितली होती. यामुळे या दोघांचे मतविभाजन अटळ आहे.

अमरावती जिल्ह्यात एकूण आठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामध्ये अमरावती, बडनेरा, दर्यापूर, अचलपूर, तिवसा, मेळघाट, मोर्शी आणि धामणगाव रेल्वे यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ अमरावती लोकसभा तर उर्वरित दोन वर्धा लोकसभा मतदारसंघात आहेत. तीन विधानसभा या काँग्रेसकडे तर दोन विधानसभा या बच्चू कडू यांच्या प्रहारकडे आहेत. एक विधानसभा अपक्ष आमदार रवी राणा यांच्याकडे आहे. भाजपकडे धामणगाव रेल्वे हा एकच विधानसभा मतदारसंघ असून तो देखील वर्धा लोकसभेमध्ये असल्याने भाजपला आमदार रवी राणा यांच्या एका मतदारसंघाच्या बळावर आणि आपल्या परंपरागत हिंदुत्ववादी मतदारावर अवलंबून राहावे लागणार आहे.

तीन विधानसभा ताब्यात असलेल्या काँग्रेससाठी जमेची बाजू आहे. त्या खालोखाल प्रहारचे वजन जिल्ह्यात आहे. नाराज आनंदराव अडसूळ यांचे समर्थन प्रहारच्या उमेदवाराला मिळाल्यास ही लढत रंगतदार होणार आहे. दुसरीकडे अमरावती लोकसभा हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. एकेकाळी रिपाइं नेते स्व. रा.सू. गवई यांच्या काळात रिपाइंचा दबदबा जिल्ह्यात होता.