या लोकसभा मतदारसंघात ६७.५७ टक्के मतदान

0

 

(Chandrapur)लोकसभेच्या चंद्रपूर – वणी – आर्णी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण ६७.५७ टक्के मतदान झाले. शुक्रवार १९ एप्रिल रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी ६७.५७ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा ४२-४३ अंशावर असतांनासुध्दा मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत मतदानाचे कर्तव्य पार पाडले. त्यामुळेच २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या निवडणुकीत तीन टक्क्यांची वाढ झाली आहे.

शुक्रवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजूरा विधानसभा मतदार संघात ७०.०९टक्के, चंद्रपूर ५८.४३ टक्के, बल्लारपूर ६८.३७ टक्के, वरोरा ६७.७३टक्के, वणी ७३.२४ टक्के तर आर्णी विधानसभा मतदारसंघात ६९.५२ टक्के मतदान झाले.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लक्ष ३७ हजार ९०७ मतदार आहे. यात ९ लक्ष ४५ हजार ७३६ पुरुष मतदार, ८ लक्ष ९२ हजार १२२ स्त्री मतदार तर ४८ इतर मतदार आहेत. यापैकी ६ लक्ष ५८ हजार ४०० पुरुष मतदारांनी (६९.६२ टक्के), ५ लक्ष ८३ हजार ५४१ स्त्री मतदारांनी (६५.४१ टक्के) तर ११ इतर नागरिकांनी (२२.९२ टक्के) असे १२ लक्ष ४१ हजार ९५२ (६७.५७ टक्के) मतदारांनी मतदान केल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.