नक्षल समर्थक आंबेडकरांचे अनुयायी असूच शकत नाही

0

भारतात नक्षलवादी चळवळी ची ज्याने सुरवात केली त्या चारु मजुमदार ची चरित्रात्मक पुस्तिका सुधीर ढवळे नी लिहिली आहे. हा तोच सुधीर ढवळे आहे जो एल्गार परिषद केस मध्ये तुरुंगात आहे. प्रतिबंधित ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी)’ या संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. हा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. पण सुधीर ढवळे ने अनेक लेख, पुस्तिका लिहल्या आहेत… त्यात तो अतिशय स्पष्टपणे नक्षल चळवळीचे समर्थन व उदात्तीकरण करतो. सदर पुस्तकात चारु मजुमदार च्या विचारासोबतच चीन चा कम्युनिस्ट नेता माओ त्से तुंग चे क्रांतिकारी, राज्यव्यवस्था विरोधी, हिंसेचा पुरस्कार करणारे विचार मांडले आहे. त्याचे काही फोटो सोबत जोडले आहेत.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर माओ त्से तुंग चे विचार दिले आहेत…” क्रांती हा एक उठाव आहे, ती अशी एक हिंसक कृती आहे की, ज्याद्वारे एक वर्ग दुसऱ्या वर्गाची सत्ता उलथून टाकतो”.

पुस्तकाच्या समारोपात सुधीर ढवळे म्हणतो… “नक्षलबारीची ४१ वर्षाची पाऊलवाट हजारो-लाखो शहिदांच्या अश्रू आणि रक्ताने माखलेली आहे. त्या शहिदांच्या त्याग-बलिदानाने ती पाऊलवाट प्रकाशमान झालेली आहे”

“चारु जाऊनही ३६ वर्षे झालीत. परंतु त्यांनी पाहिलेलं क्रांतीचं स्वप्न आजही जिवंत आहे….. ते स्वप्न साकार करण्यासाठी आज देशाच्या खूप मोठ्या भूभागात क्रांतिकारकांचे काफ़िले कूच करत आहेत. त्या काफ़िल्यात चारु ‘जिवंत’ आहेत, जिवंत राहतील.”

हे आहेत सुधीर ढवळे (Sudhir Dhavale ) चे माओवादी विचार. जो व्यक्ती नक्षलवादी चळवळीचे जाहीर समर्थन करतो, नक्षलवाद्यांना शहिद म्हणतो… आणि चारु चे रक्तरंजित क्रांती चे म्हणजेच येथील संविधानिक व्यवस्था उलथून टाकत माओवादी पक्षाची सत्ता स्थापण्याचे स्वप्न साकार करण्याची इच्छा व्यक्त करतो. याला माओवादी नाहीतर गांधीवादी म्हणायचे का?

एकीकडे माओवाद्यांच्या रक्तरंजित हिंसाचाराचे समर्थन करायचे आणि समाजातून हिंसाचाराला प्रोत्साहन द्यायचे, समाजात तेढ निर्माण होईल असे फुटीरतावादी विचार मांडायचे, काम करायचे हे भयानक आहे. हे असे ढवळे सारखे लोक काहींना मात्र विचारवंत,सामाजिक कार्यकर्ते वाटतात हे घोर अज्ञान आणि दुर्दैव आहे.

नक्षली चळवळ भारत विरोधात सशस्त्र संघर्ष करत आहे. यांनी मागील पन्नास वर्षात हजारो पोलीस जवानांच्या व दलित-आदिवासी नागरिकांचे हत्याकांड केलेले आहे. अनेक #नक्षलवादी पोलीस चकमकीत मारले जातात… अशा नक्षलींना सुधीर ढवळे ला मात्र ‘शहिद’ म्हणतो.

कोरेगाव भीमा (Koregaon Bhima)दंगलीच्या एक दिवस अगोदर पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत सुधीर ने अत्यंत जहाल, चिथावणीखोर कविता म्हटली, भाषण केले, त्याच्या भाषणाच्या सुरुवातीला तो म्हणतो,
‘जब जुल्म हो तब बगावत होनी चाहिये शहरमे
जब जुल्म हो तब बगावत होनी चाहिये शहरमे
और अगर बगावत ना हो तो
बेहतर हो के
ये रात ढलने से पेहले
ये शहर जलकर राख हो जाये
ये शहर जलकर राख हो जाये”

शहर जाळण्याची भाषा निश्चितच संविधानिक नाही. हा ढवळे ‘विद्रोही’ नावाचे मासिक प्रकाशित करायचा त्यातही असेच जहाल लिखाण, कविता असायच्या. एल्गार परिषदेच्या तयारी साठी या ढवळे आणि गॅंग ने संभाजीनगर ला एक सभा घेतली होती त्यात ढवळे अन्याया विरोधात बस जाळण्याचा पर्याय लोकांना सुचवतो.

अन्याय विरोधात सनदशीर मार्गे लढा दिला पाहिजे त्यासाठी कायदे आहेत, ऍट्रोसिटी सारखे विशेष कायदे सुद्धा आहेत. सरकार आहे, संघटना आहेत, न्याय व्यवस्था आहे पण या माओवादी विचारांच्या लोक हे मुळात या व्यवस्थांच्या विरोधी असतात म्हणून त्यांना हे सनदशीर मार्ग नको असतात. हे लोक असे जहाल माओवादी विचार पेरून समाजात अराजक माजवतात, जाती-जाती मध्ये तेढ निर्माण करतात, समाजात संघर्ष होईल असे वातावरण निर्माण करतात आणि त्याचे परिणाम म्हणून कोरेगाव भीमा सारखी घटना घडते.

इतकं स्पष्ट असूनही काही लोक मात्र यांचे समर्थन करतात, यांना विचारवंत म्हणतात तेंव्हा मात्र आश्चर्य वाटते. या ढवळे वर काँग्रेस काळातही कारवाई झालेली आहे, कबीर कला मंच च्या कलाकारांवर सुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादी च्या काळात कारवाई झालेली आहे. एवढंच काय काँग्रेस केंद्रात सत्तेत असतांना त्यांनी कबीर कला मंच ला माओवाद्यांची ‘फ्रंट’ संघटना घोषित केलेले आहे. दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक राहिलेला जी.एन.साईबाबा वर माओवादी असल्याचे आरोप सिद्ध होऊन तो जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. त्यामूळे आपल्या सुरक्षा यंत्रणांवर, न्यायालयावर आपण विश्वास ठेवावा. लोकशाही विरोधात सक्रिय असलेली माओवादी चळवळ हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे. त्यामुळे ढवळे सारख्या लोकांविषयी सहानुभूती दाखविण्याची आवश्यकता नाही. हे लोक संविधानाचे शत्रू आहेत.