उन्हाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी

0

सरासरी तापमानापेक्षा किमान 1-2 अंश से. ने जास्त आहे. मानवास ज्याप्रमाणे वाढत्या तापमानास तोंड द्यावे लागते तीच परिस्थिती पशुधनाची ही असते. त्यामुळे पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

वातावरणातील तापमान वाढीचे परिणाम पशुधनाच्या शरीरक्रियेवर होऊन पशुधन आजारी पडू शकते किंवा दगावण्याची शक्यताही असते. त्यास उष्माघात किंवा उष्णलहरी म्हटले जाते. एखाद्या भुभागात, भौगोलिक क्षेत्रात उष्णलहरी असताना वातावरणातील तापमान त्या काळातील नियमित सरासरी तापमानापेक्षा किमान 3 अंश से. किवा जास्त तापमान सलग 3 दिवसांसाठी किंवा जास्त कालावधीसाठी असू शकते. अशा ठिकाणी 45 अंश सेल्सिअस किंवा जास्त तापमान सलग 2 दोन दिवसांसाठी असू शकते. यामुळे पशुधनाच्या शरीरातील पाणी व क्षार यांचे प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशन होते. तसेच चारा व खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते आणि त्याचा परिणाम म्हणून उत्पादन कमी होते.

उष्ण लहरींपासून बचाव व उष्ण तापमानास जुळवुन घेण्यासाठी पशुधनास सवयीचे करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रथमोपचार व पशुवैद्यकीय उपाय याबाबींद्वारे उष्णलहरीपासून होणा-या आजारांपासून पशुधनांचा बचाव करता येतो. तुलनेने थंड तापमानातून पशुधनास थेट उष्ण तापमानात नेण्याचे टाळावे. पशुधनास फक्त दिवसाच्या थंड वेळी चरावयास सोडावे व उष्ण कालावधीत सावलीत अथवा हवेशीर निवा-यात ठेवावे. पशुधनास वाढत्या तापमानाची हळू हळू सवय लावावी.

लहान वासरे, करडे, काळया अथवा गडद रंगाचे प्राणी, श्वासाच्या आजाराने ग्रस्त अथवा आजारी पशुधन, वराह, नुकतेच लोकर कापलेल्या मेंढ्या, दुभते पशुधन, मोठ्याचणीची जनावरे अशा पशुधनास व कुक्कुट पक्ष्यांना उष्माघाताचा जास्त धोका असतो.

उष्माघात किंवा उष्णलहरींच्या प्रकोपाचा प्रभाव झालेले पशुधन ओळखने अत्यंत महत्वाचे असते. अशा पशुधनास धाप लागणे, श्वासाचा दर वाढणे, पाणी जास्त प्रमाणात पिणे, चारा पाणी घेण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट,पशुधन सुस्तावते, लाळ गाळते, नाकपुड्या कोरड्या पडतात, पशुधनाच्या शरीरातील पाणी व क्षार (डिहायड्रेशन) यांचे प्रमाण कमी होणे ही लक्षणे आहेत.

उष्णलहरींच्या वेळी काय करावे(What to do during heat waves):-

१. स्थानिक हवामानाच्या अंदाजावर व दैनिक तापमानावर लक्ष ठेवावे.

२. चारा व वैरण यांचा पुरेसा साठा ठेवावा.

३. पशुखाद्य देताना पुरेसे क्षार व जिवनसत्व मिश्रणे द्यावीत. उत्पादक , दुभत्या पशुधनास संतुलित आहार द्यावा. ४. दुभत्या पशुधनांच्या सायंकाळच्या दोहनाच्या वेळा टप्याटप्प्याने किमान १ तास उशिराने ठेवाव्या जेणे करून पशुधनापासून योग्य उत्पादन मिळेल.

५. पशुधनासाठी आधुनिक गोठे असलेल्या पशुपालकांनी प्रिंकलर ची सोय करावी. इतर पशुपालकांनी पशुधनावर पाणी मारणे / फवारणे किंवा म्हैस वर्गीय पशुधनासाठी शक्य असल्यास पाण्यात बसण्यासाठी स्वच्छ पाण्याच्या हौदाची सोय करावी…

६. शेतीच्या, वहनाच्या व इतर कामासाठी वापरण्यात येणा-या पशुधनास उन्हाच्या (शक्यतो दिवसा १२ ते ४ या वेळी किंवा स्थानिक उन्हाच्या वेळानुसार) वेळी विश्रांती द्यावी. त्यांना सावलीत अथवा थंड व भरपूर खेळती हवा असलेल्या जागेत बांधावे.

७ . स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची सोय असावी. पिण्याच्या पाण्याची भांडी स्वच्छ ठेवावीत.

८. शक्यतो पिण्याच्या पाण्याचे हौद अथवा इतर सुविधा गोठ्याजवळ व सावलीत असावी, नसल्यास अशा ठिकाणी सावलीसाठी शेड उभारण्याचा प्रयत्न करावा, जेणे करून पशुधनास थेट उन्हाचा संपर्क येणार नाही, ९. अश्ववर्गीय पशुधनास उष्णलहरींपासून बचावासाठी पायाकडून शरीराच्या वरील भागास थंड पाण्याचा हळूवार शिडकावा करावा,

१०. गाभण पशुधनास पुरेसे पशुखाद्य व चारा / वैरण द्यावे.

११. वराह प्रजातींच्या पशुधनास पुरेसा निवारा, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि शक्य असल्यास पाण्यात बसण्याची सोय असावी.

१२. कुक्कुट पक्षांसाठी वातानुकुलीत पक्षीगृह सर्वोत्तम असतात. तथापि ज्या पक्षीगृहांना अशी सोय नाही त्यांनी पक्षीगृहाच्या शेडवर गवताचे अच्छादन करावे, पक्षीगृहाच्या जाळ्यांना पडदे लावून त्यावर पाणी शिंपडावे. तसेच पक्षीगृहात भरपूर खेळती हवा राहिल याची दक्षता घ्यावी.

१३. पाळीव पशुधनास उन्हाच्या वेळी शक्यतो घरात ठेवावे.

१४. पशुधनाच्या निव-यासाठी / छतासाठी उष्णता रोधक मटेरीयल वापरावे.

१५. मृत पशुधनाची विल्हेवाटीची जागा सार्वजनिक ठिकाणे, पाणवठे यांच्या पासून दूर असावे तसेच ते संरक्षीत असावे तसेच तेथे फलक लावण्यात यावा.

 उष्णलहरींच्या वेळी काय करू नये(What not to do during heat waves):-

१. पशुधनास उन्हात उघड्यावर बांधु नये.

२. पाळीव पशुधनास पार्क केलेल्या गाडीत सोडून जाऊ नये.

३. शेती विषयक व इतर कामासाठी वापरण्यात येणा-या पशुधनास उन्हाच्या वेळी कामास लावू नये. ४. पशुधनास पिण्याच्या पाण्यासाठी उन्हात फार दूर व फार वेळ चालावे लागू नये याची दक्षता घ्यावी.

५. पशुधनाची गर्दी करू नये. दाटीवाटीने बांधु नये.

६. भर उन्हात पशुधनाची हलचाल / वाहतुक करू नये.

७. उन्हे असल्यास दुभत्या पशुधनाचे दोहन करून नये.

८. मृत पशुधन उघड्यावर टाकू नये.