पंतप्रधानांच्या दौऱ्यात गडकरी दुर्लक्षित?

0

सुनील कुहीकर

पंतप्रधानांचा ( NAREDRA MODI ) रविवारचा नागपूर दौरा आटोपल्यानंतर एव्हाना, त्याचे कवित्व सुरू झाले आहे. दौऱ्यानंतर विस्कळीत झालेल्या वाहतूक व्यवस्थेपासून तर दौऱ्यादरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्षांना मिळालेले महत्व बघता हे सारे सरकारी कार्यक्रम होते की ( BJP ) भाजपा नामक एका राजकीय पक्षाचे, असे विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दरम्यान, नागपूरच्या या दौऱ्यात पंतप्रधानांनी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री ( EKNATH SHINDE ) एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेली वागणूक हा सर्वाधिक चर्चेचा आणि राजकीय निरीक्षकांच्या नजरेतून न सुटणारा मुद्दा ठरला आहे.या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या जवळ गेले. त्यांनी हात उंचावून लोकांना प्रतिसाद दिला. मेट्रोच्या प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांशी हितगूज साधले. रेल्वे अधिकाऱ्यांशी हसतमुखाने बातचीत केली. एका क्षणी तर ते ढोलताशा पथकातील कलावंतांच्या गर्दीत शिरले. एका कलावंताजवळ जाऊन, त्यांनी ढोल देखील वाजवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तर दिलखुलास दाद दिली. हातात हात घेऊन, खांद्यावर हात ठेवून त्यांनी शिंदेंसोबतची जवळिक सर्वांच्या नजरेत भरेल इतक्या सहजपणे स्पष्ट केली. इतकेच कशाला एम्स परिसरातील जाहीर सभेत तर शिंदेचे भाषण सुरू असताना मोदींनी देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केल्याचे लोक बघत होते.


पण या संपूर्ण दौऱ्यात पंतप्रधानांच्या एकूणच वर्तनातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मात्र दुर्लक्षित राहिल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. कार्यक्रमाची रुपरेषाच तशी होती, तो कुणाच्या तरी राजकारणाचा भाग होता की, व्यवस्थितपणे हा प्रकार घडला, घडवला गेला, कुणास ठावूक, पण एकनाथ शिंदेंच्या तुलनेत फडणवीसांना आणि या दोघांच्या तुलनेत नितीन गडकरी यांना मिळालेली वागणूक दुय्यम दर्जाची होती, हेच राजकीय निरीक्षकांचे मत आहे.


वंदेभारत एक्स्प्रेसला हिरवी झेंडी दाखवताना केंद्रीय मंत्री असलेले गडकरी मागच्या रांगेत उभे होते. समॄद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यासाठी कोनशिलेचे अनावरण करताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पंतप्रधानांसोबत तर गडकरी दुसऱ्या बाजुला, भाषणाच्या सुरवातीला मंचावरील नेत्यांची नावे घेतानाही नरेंद्र मोदी यांनी फडणवीसांनंतरचे स्थान गडकरींना दिले. इतकेच कशाला, भाषण संपवून मंचावरून खाली उतरत असताना ज्या पद्धतीने मोदींनी गडकरींकडे दुर्लक्ष केले, तेही कुणाच्याच नजरेतून सुटले नाही.


पंतप्रधानांच्या दौऱ्यात जे जे, जसजसे घडत गेले, त्याचा हा तपशील आहे. दिल्लीच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांची सरशी अधोरेखित होत असतानाच, गडकरींचे महत्व कमी करण्याचे राजकारण वेगात चालले असल्याच्या चर्चेला उधाण येईल याची तजवीज पंतप्रधानांच्या वर्तनातून आपसूकच झाली आहे….

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा