
वर्षभरात 10 हजारावर ग्राहकांचा सहभाग,पर्यावरणस्नेही 32 हजारांवर ग्राहकांना 39 लाखाचा फायदा
नागपूर, 5 जानेवारी 2026: वीजबिलांच्या छापील कागदांचा वापर बंद करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या ‘गो-ग्रीन’ योजनेला वीजग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षभरात नागपुर परिमंडलातील तब्बल 10 हजार 588 वीजग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला आहे.
वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘इमेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडून शुक्रवार (दि. 2) पर्यंत नागपुर परिमंडलातील लघुदाब वर्गवारीतील पर्यावरणस्नेही 32 हजार 853 ग्राहक या योजनेत सहभागी झाले आहे व त्यांना 39 लाख 42 हजार 360 रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे.
‘गो-ग्रीन योजनेतील वीजग्राहकांचा वाढता प्रतिसाद सहभाग स्वागतार्ह आहे. त्यांना वीजबिल डिजिटल स्वरुपात पाठवले जात आहे. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे’, असे आवाहन महावितरणने केले आहे.
गेल्या वर्षभरात 10 हजारांवर ग्राहकांचा सहभाग :वीजग्राहकांसाठी ऐच्छिक असलेल्या गो-ग्रीन योजनेला नागपूर परिमंडलात प्रतिसाद वाढत आहे. विशेष म्हणजे मागिल वर्षभरात 10 हजार 588 ग्राहकांची या योजनेत भर पडली आहे. यात नागपूर जिल्ह्यात 9 हजार 440 ग्राहकांचा तर वर्धा जिल्ह्यातील 1 हजार148 ग्राहकांचा समावेश आहे.
या योजनेत आतापर्यंत 32 हजार 853 पर्यावरणस्नेही वीजग्राहक सहभागी झाले आहेत. या ग्राहकांना 39 लाख 42 हजार 360 रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 28 हजार 501 ग्राहकांना 34 लाख 20 हजार 120 तर वर्धा जिल्ह्यातील 4 हजार 352 ग्राहकांना 5 लाख 22 हजार 240 रूपयांचा वार्षिक फायदा होत आहे.
असे व्हा योजनेत सहभागी:
गो-ग्रीन योजनेसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाइटवर किंवा मोबाईल अॅपवर नोंदणी करण्याची स्वतंत्र सोय उपलब्ध आहे. केवळ ग्राहक क्रमांक सबमीट करावे लागेल व छापील बिलाची प्रत रद्द करून संबंधितांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक व इमेलवर दरमहा बिल पाठविण्यात येईल. नोंदणीकृत मोबाईल किंवा इमेल बदलण्याची सोय देखील त्याच ठिकाणी उपलब्ध आहे.
वार्षिक 120 रूपयांचा फायदा:
महावितरणकडून गो-ग्रीनचा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात 10 रुपये सवलत देण्यात येत आहे. यात ग्राहकांचा वीजबिलामध्ये वार्षिक 120 रुपयांचा फायदा होत आहे. विशेष म्हणजे गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडल्यानंतर संबंधित ग्राहकांच्या पहिल्याच वीजबिलामध्ये पुढील 12 महिन्यांची म्हणजे 120 रुपयांची सवलत एकरकमी देण्यात येत आहे.
गो-ग्रीन योजनेचे फायदे:
गो-ग्रीन सहभागी झालेल्या ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत ‘इमेल’वर व मोबाईल ‘एसएमएस’द्वारे दरमहा वीजबिल पाठविण्यात येत आहे. वीजबिलांच्या तारखेपासून सात दिवसांमध्ये रकमेचा तत्पर भरणा केल्यास एक टक्के सवलत दिली जाते. त्यासाठीही ऑनलाईन बिल भरणे सोयीचे झाले आहे. इमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणक किंवा मोबाइलमध्ये जतन करून ठेवता येते. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.





















