Home Artical Blog महावितरणच्या भरारी पथकाचा वीजचोरांना दणका

महावितरणच्या भरारी पथकाचा वीजचोरांना दणका

0

वर्षभरात 9.46 कोटींची अनियमितता उघड, 51 जणांवर फौजदारी गुन्हे

नागपूर(Nagpur), दि. 15 एप्रिल 2026: महावितरणच्या ‘सुरक्षा व अंमलबजावणी’ विभागा अंतर्गत कार्यरत भरारी पथकाने नागपूर शहर आणि ग्रामीण भागात वीजचोरी विरोधात धडाकेबाज मोहीम राबवत एका वर्षात मोठे यश संपादन केले आहे. एप्रिल 2025 ते मार्च 2026 या आर्थिक वर्षात भरारी पथकाने केलेल्या धडक कारवायांमध्ये सुमारे 9 कोटी 46 लाख 5 हजार रुपयांची वीजचोरी आणि अनियमितता उघडकीस आणली आहे. या प्रकरणी कठोर पावले उचलत 51 ग्राहकांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कारवाईचा तपशील आणि आकडेवारी: या विशेष मोहिमेत भरारी पथकाने 331 ग्राहकांकडील थेट वीजचोरी उघड केली. ‘विद्युत कायदा 2003 (सुधारीत 2007)’ च्या कलम 135 अन्वये झालेल्या या कारवाईत 3.206 दशलक्ष युनिट वीजचोरीपोटी 6 कोटी 57 लाख 84 हजार रुपयांची प्रकरणे समोर आली आहेत. केवळ चोरीच नव्हे, तर विजेचा अनधिकृत वापर आणि मंजूर भारापेक्षा अधिक वापर करणाऱ्यांवरही महावितरणने लक्ष केंद्रित केले आहे. कलम 126 अंतर्गत अशा 46 प्रकरणांमध्ये 0.164 दशलक्ष युनिट वीज वापरापोटी 22 लाख 68हजार रुपयांची अनियमितता उघड झाली. याव्यतिरिक्त इतर 54 प्रकरणांमध्ये 6.629 दशलक्ष युनिट वीज वापरापोटी 2 कोटी 65 लाख 53 हजार रुपयांचे देयक आकारण्यात आले आहे. या सर्व कारवायांतून निर्धारित केलेल्या 9 कोटी 46 लाख 5 हजार रुपयांपैकी 6 कोटी 20 लाख 24 हजार रुपयांची वसुली महावितरणने यशस्वीपणे पूर्ण केली आहे. तर, 51 ग्राहकांवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस बडगा आणि सामाजिक आवाहन: ज्या ग्राहकांनी चोरीची रक्कम आणि दंड भरण्यास टाळाटाळ केली, त्यांच्यावर महावितरणने पोलीस कारवाईचा बडगा उगारला आहे. वीजचोरी हा केवळ गुन्हा नसून तो एक सामाजिक अपराध आहे, ज्यामुळे वितरण हानी वाढून प्रामाणिक ग्राहकांवर आर्थिक बोजा पडतो. हे रोखण्यासाठी महावितरणने जनतेला मदतीचे आवाहन केले आहे. वीजचोरीची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवून त्यांना आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

प्रशासकीय पथक: ही यशस्वी मोहीम महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) अपर्णा गिते, मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि उपसंचालक सुनील थापेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. यामध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता वैभव नारखेडे, सहायक अभियंता आशीष चोथे, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी विश्वनाथ बिसने, वरिष्ठ तंत्रज्ञा राजेश मोर्य आणि वैशाली बारलिंगे यांच्या पथकाने मोलाची कामगिरी बजावली.

“नागरिकांनी चोरट्या मार्गाने वीज न वापरता अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा आणि जबाबदार नागरिक म्हणून महावितरणला सहकार्य करावे,” असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेतही प्रशासनाने दिले आहेत.

वीजचोरी उघडकीस सज्ज असलेले महावितरणचे भरारी पथक

उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर