
मराठी संस्कृतीचाही झाला जागर
नागपूर(Nagpur), 15 एप्रिल:
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शेफ विष्णू मनोहर यांनी अमेरिकेतील बोस्टर शहरात आयोजित एका कार्यक्रमात पाश्चात्य जगाला भारतीय मसाल्यांमधील विज्ञान आणि सात्विक जीवनशैलीचे महत्त्व पटवून देत ‘आहार क्रांती’चा शंखनाद केला.
अमेरिकेच्या बोस्टन शहरात ओमग्राम आयुर्वेद आयोजित व अपर्णा जोशी यांच्या संकल्पनेवर आधारित ‘टेस्ट ऑफ आयुर्वेद’ महोत्सवात विष्णू मनोहर नुकतेच सहभागी झाले होते.
भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे आयुर्वेद आणि सात्विक आहार असून आपण जे खातो, त्याचा थेट परिणाम आपल्या विचारांवर आणि आरोग्यावर होतो. म्हणूनच, ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ मानून त्याचा औषधाप्रमाणे वापर केल्यास आपण व्याधीमुक्त जीवन जगू शकतो,’ असे प्रतिपादन विख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी केले. त्यांनी तयार केलेल्या सात्विक पदार्थांच्या सुगंधाने आणि चवीने केवळ भारतीयच नव्हे, तर परदेशी नागरिकही भारावून गेले होते. विष्णू मनोहर यांच्या पाककलेचा तडका आणि आरोग्याचा मंत्र यांचा हा अनोखा संगम बोस्टनच्या भूमीवर सुवर्णयोग ठरला आहे.
या महोत्सवात पंचकर्म आणि योगसाधनेचा अनुभवदेखील मोठ्या संख्येने उपस्थित अमेरिकन नागरिकांना देण्यात आला. तसेच, पारंपरिक नऊवारी साड्या, नथ आणि सुवर्णालंकारांनी सजलेल्या महिलांनी बोस्टनच्या रस्त्यांवर मराठी संस्कृतीचा जागर केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आहार क्रांती’ संकल्पनेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याचे काम या उपक्रमाने चोख बजावले आहे. परदेशात राहूनही आपला सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या मराठी बांधवांच्या उत्साहामुळे अमेरिकन भूमीवर भारतीय अस्मितेचा डंका वाजत आहे, असे विष्णू मनोहर म्हणाले.

















