सुरक्षा दलाच्या कारवाईत 6 नक्षलवादी ठार

0

छत्तीसगड – वीजापूर (Vijapur), 27 मार्च : छत्तीसगडच्या बीजापूर येथे आज, बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 6 नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळवले आहे. मृतकांमध्ये 4 पुरुष आणि 2 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. यावेळी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.

यासंदर्भातील माहितीनुसार विजापूरमधील नक्षलग्रस्त बासागुडा पोलीस स्टेशन हद्दीतील पोलमपल्ली-चिपूरभट्टी येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या प्लाटून क्रमांक 10 यांच्यात बुधवारी सकाळी 8 वाजता चकमक झाली. यात 6 नक्षलवादी ठार झाले. चकमकीनंतर 2 महिला आणि 4 पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडलेत. त्यांची ओळख पटवली जात आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये त्यांच्या डेप्युटी कमांडरचाही समावेश आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्र, दारूगोळा आणि दैनंदिन वापरातील वस्तू जप्त केल्या आहेत. या चकमकीत अनेक नक्षलवादी जखमी होण्याची शक्यता आहे. घटनास्थळ आणि परिसरात पोलिसांचा शोध सुरू आहे.

बिजापूरचे एसपी जितेंद्र यादव यांनी सांगितले की, होळीच्या दिवशी बासागुडा पोलिस स्टेशन परिसरात नक्षलवाद्यांनी कुऱ्हाडीने हल्ला करून 3 गावकऱ्यांची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर बासागुडा पोलीस स्टेशन हद्दीतील पोलमपल्ली-चिपूरभट्टी परिसरात सशस्त्र नक्षलवाद्यांचा जमाव असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली. या माहितीनंतर डीआरजी, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि कोब्रा जवानांचे संयुक्त पथक रवाना करण्यात आले. यादरम्यान बुधवारी सकाळी जवानांचा नक्षलवाद्यांच्या प्लाटून क्रमांक 10 चकमक उडाली.

यासंदर्भात बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनी सांगितले की, बासागुडा पोलिस स्टेशन हद्दीतील पोलमपल्ली-चिपूरभट्टी भागात नक्षलवाद्यांचा मेळावा असल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाली होती. या माहितीनंतर कोब्रा 210, 205 सीआरपीएफ, 229 बटालियन आणि डीआरजी जवानांची संयुक्त टीम रवाना करण्यात आली. जिथे सैनिकांचा सामना नक्षलवाद्यांच्या प्लाटून क्रमांक 10 शी झाला. चकमकीनंतर 6 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे 30 मार्च रोजी नक्षलवाद्यांनी विजापूर जिल्ह्यात बंदची हाक दिली आहे.