उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने पुन्हा एकदा जगाला अणुयुद्धात ढकलण्याचा इशारा दिलाय. (North Korea’s Dictator Kim Jong Un threat) किम जोंग उनने अमेरिका आणि मित्र राष्ट्रांना हा इशारा दिला आहे. अमेरिकेने आमच्यावर हल्ला केल्यास उत्तर कोरिया अण्वस्त्र हल्ला करेल, अशी थेट धमकीच हुकुमशहा किमने दिली आहे. अलिकडेच उत्तर कोरियाने मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या आहे. त्याने डागलेली अनेक क्षेपणास्त्रे जपानच्या समुद्री हद्दीतही कोसळली आहेत. त्यामुळे जपानच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. उत्तर कोरियाच्या हुकुमशहाने आपला उद्दामपणा नियंत्रणात ठेवावा, असा इशारा अमेरिकेकडून वारंवार दिला जातोय. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढत आहे.
हुकुमशहा किंम जोंग उन याने म्हटले आहे की, सततच्या धमक्यांना उत्तर कोरिया नक्कीच प्रत्युत्तर देईल. शनिवारी क्षेपणास्त्र चाचणी पाहण्यासाठी किम जोंग स्वतः उपस्थित होता. यावेळी त्याने अमेरिकेसह सर्व पाश्चिमात्य देशांनाही अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. गुरुवारी उत्तर कोरियाने डागलेले इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल जपानच्या समुद्री हद्दीत जाऊन पडले होेते. अमेरिकेची दबावाची रणनीती आणि दक्षिण कोरिया-जपानच्या प्रदेशातील त्यांच्या वृत्तीला प्रत्युत्तर म्हणून हे क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचे उत्तर कोरियाच्या लष्कराने म्हटले होते.
दम्यान, उत्तर कोरियाच्या चिथावणीखोर धमक्यांवर अमेरिका नेमकी काय भूमिका घेते, याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागलेले आहे. हुकुमशहा किंम जोंग उन याचा उद्दामपणा सातत्याने वाढत असून जगाला धोका निर्माण झाला असल्याचे मत अमेरिकन काँग्रेसने यापूर्वीच व्यक्त केले आहे.