

अमरावती (Amravati):- अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-अचलपूर येथील खळबळजनक लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणाच्या पोलीस तपासावर ‘नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स, विदर्भ’च्या सत्यशोधन समितीने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. समितीने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, स्थानिक सामाजिक आणि हिंदू संघटनांनी सध्या सुरू असलेल्या तपासाच्या गतीवर आणि एकूणच प्रक्रियेवर तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. या प्रकरणाची केवळ वरवर चौकशी न करता अधिक सखोल आणि संपूर्णपणे निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.
सत्यशोधन समितीच्या अहवालानुसार, या गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असून मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या संपूर्ण साखळीचा (रॅकेटचा) छडा लावणे आवश्यक आहे. हा गुन्हा केवळ सायबर गुन्हेगारीपुरता मर्यादित नसून यामागे मोठे नेटवर्क असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे तांत्रिक पुरावे आणि डिजिटल डेटा फॉरेन्सिक लॅबकडून तातडीने विश्लेषित करून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून तपास यंत्रणांना ठोस दिशा मिळू शकेल.
दुसरीकडे, भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या भीतीनुसार पीडितांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे, मात्र पोलिसांना सध्या काही मोजक्याच पीडितांची ओळख पटवण्यात यश आले आहे. या पार्श्वभूमीवर, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करावी तसेच पीडित कुटुंबे आणि या लढ्यात पुढे आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही अहवालात अधोरेखित करण्यात आला आहे. तपासादरम्यान संपूर्ण पारदर्शकता राखली जावी आणि पीडितांवर कोणताही दबाव न येता त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी संघटनांनी केली आहे.
या प्रकरणाचा संपूर्ण शोध सत्य शोधन समिती सदस्यांनी कोणत्याही स्थानिक किंवा राष्ट्रीय राजकीय पक्षाशी संलग्न न राहता प्रत्यक्षदर्शींशी थेट संवाद साधला आणि या सेक्स स्कॉडलबाबत तर्कसंगत निष्कर्ष काढला. या समिती सदस्यांमध्ये श्री. चारुदत्त कहू (लोकवाहिनीचे संपादक आणि समितीचे समन्वयक), श्री. उदय अंधारे (वरिष्ठ पत्रकार आणि समितीचे अध्यक्ष), श्री. मनोज जोशी (वरिष्ठ पत्रकार), श्री. संजय जोशी (वरिष्ठ वार्ताहर), श्री. कार्तिक लोखंडे (वरिष्ठ फ्रीलान्स पत्रकार), श्री. श्रेयस पन्नासे (अनुभवजन्य संशोधक आणि अभ्यासक), सौ. स्नेहल जोशी (ब्युरो चीफ, सुदर्शन न्यूज), श्री. एस. जयंतकुमार (राजकीय निरीक्षक आणि विश्लेषक), श्री. प्रवीण तायडे (‘गावरान’ ९० चे मुख्य संपादक), अॅड. नितीन चौधरी (वकील, परतवाडा), श्री. अशोक पिंजरकर (पत्रकार, परतवाडा), श्री. अविनाश पाठक (ज्येष्ठ पत्रकार आणि समितीचे सल्लागार) यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.


















