मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यातील बैठक रद्द झाल्याचे सांगितले गेले असतानाच हे दोन्ही नेते ग्रँड हयात या हॉटेलमध्ये (Uddhav Thackeray and Prakash Ambedkar) भेटल्याचे उघडकीस आले असून या भेटीबाबत एवढी गुप्तता बाळगण्याचे कारण काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सुरुवातीला या दोन नेत्यांमध्ये आज बैठक होणार असल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर दुपारी स्वतः प्रकाश आंबेडकरांनी अशी कुठलीच बैठक आज ठरली नसल्याचा दावा केला होता. दोन्ही नेत्यांनी आजच्या भेटीबाबतची माहिती सार्वजनिक होऊ नये, यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. मात्र, आता ही बैठक झाल्याचे वृत्त असून त्यात संभाव्य युतीवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिवसेनेतील फुटीनंतर आता उद्धव ठाकरे हे नव्या मित्रपक्षाच्या शोधात आहेत. अशातच त्यांच्यापुढे वंचित बहुजन आघाडीचा पर्याय पुढे आला आहे. प्रकाश आंबेडकर यांनाही आपल्या राजकीय पाठिंब्याचे रुपांतर निवडणुकीतील यशात करायचे आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने सध्याची राजकीय गरज लक्षात घेता आघाडी करण्याबाबत एकमत झाल्याचे समजते. आज झालेल्या बैठकीला ठाकरे आणि आंबेडकर यांच्यासह शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर हेदेखील उपस्थित होते. ही बैठक सुमारे दोन तास सुरू होती. मुंबईतील ‘ग्रॅण्ड हयात’ मध्ये ही बैठक सुरू होती. आगामी मुंबई महापालिका (BMC Election) आणि इतर महापालिका निवडणुकीतील आघाडीच्या अनुषंगाने ही चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाकरे गट व वंचित बहुजन आघाडी युती झाल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे काय होणार, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत कितपत स्थान मिळणार, हे प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत.
