केंद्रीय मंत्री आठवलेंकडून प्रकाश आंबेडकरांना पुन्हा एकदा ऐक्याचा प्रस्ताव

0

नवी दिल्लीः शिवसेनेचा ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी (Uddhav Thackeray and Prakash Ambedkar) या दोन पक्षांची युती होण्याची शक्यता व्यक्त होत असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना पुन्हा एकदा ऐक्याची साद घातली (Union Minister Ramdas Athawale`s Proposal to Prakash Ambedkar) आहे. आंबेडकर यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, असा प्रस्तावही आठवले यांनी दिला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित मुंबईत चैत्य भूमीवर (Chaitya Bhumi) बोलताना रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर भाष्य केले. महाराष्ट्रात शिवशक्ती-भीमशक्ती (Shiv Shakti-Bhim Shakti) पुन्हा एकत्र येण्याचे प्रयत्न ठाकरे व प्रकाश आंबेडकरांमार्फत सुरु आहेत. त्यासाठी बैठका सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी पुन्हा एकदा आंबेडकर यांना प्रस्ताव दिलाय.
यासंदर्भात बोलताना आठवले म्हणाले की, भीमशक्ती खऱ्या अर्थाने टिकवून ठेवण्याचे काम मी केले आहे. २०११ मध्ये बाळासाहेबांनी हाक दिल्यानंतर मी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. आज मी भाजपसोबत आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. आमचीच खरी शिवशक्ती-भीमशक्ती आहे. प्रकाश आंबेडकरांची भीमशक्ती नसून वंचित शक्ती आहे, असे ते म्हणाले. प्रकाश आंबेडकरांना ऑफर कायम आहे. त्यांनी माझ्या पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे. एक विचार, एक पक्ष ही काळाची गरज असून बाबासाहेबांचा पक्ष जिवंत ठेवणे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे, असेही आठवले म्हणाले.
दरम्यान, कालच उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर या नेत्यांमध्ये युतीबद्धल बैठक झाली असून त्यात नेमका काय निर्णय झाला, हे अद्याप अस्पष्ट आहे.