राजकारण म्हणजे मिमिक्री नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

0

मुंबईः शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकारण हे काही मिमिक्री करण्यासाठी नाही, असे सांगताना आम्हाला मिमिक्री पहायचीच असेल तर आम्ही जॉनी लिव्हर, राजू श्रीवास्तव यांची मिमिक्री बघू, असा चिमटा त्यांनी राज ठाकरे यांना काळा आहे. (Sanjay Raut On Raj Thackeray) वेगवेगळ्या व्यक्तींचे आवाज काढणे, नक्कल करणे हे आता खूप झाले. आपण मॅच्युअर्ड झालेले आहात. संपूर्ण महाराष्ट्र पाहा असे आवाहन करताना राऊत यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करून तुमचे राजकारण किती काळ चालणार असा प्रश्नही केला. अलिकडेच राज ठाकरे यांनी मुंबईतील पक्षाच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्याला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली होती.


खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांच्या उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेचा समाचार घेतला. राज ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावताना राऊत म्हणाले की, मिमीक्री पाहायची असेल तर आम्ही जॉनी लिव्हर, राजू श्रीवास्तव यांची मिमिक्री पाहू. राजकारण म्हणजे मिमिक्री नाही. संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना संघटनात्मक कामे करण्याचा सल्ला दिला. आमच्या पक्षावर संकटे आली असूनही आम्ही काम करत असून लढत आहोत. ज्यांनी आमच्यावर टीका केली त्यांनी बुलढाण्याची सभा पाहायला हवी होती. बुलढाण्यातील प्रतिसाद पाहायला हवा होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला, सभेला मोठी गर्दी लोटली होती, असेही राऊत यांनी म्हटले. राहुल गांधी यांनी मागील तीन महिन्यात जे कष्ट घेतले आहेत, मेहनत घेतली ती पाहता त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी चार दिवस तरी एवढी मेहनत घेऊन दाखवावी असे आव्हानही राऊत यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना दिले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा