विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प – देवेंद्र फडणवीस

0

 

नागपूर- केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा आहे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे त्यांनी आभार मानले. केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, या अंतरिम अर्थसंकल्पात विशेषत: महिला, शेतकरी, गरीब, युवा आणि मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न झाला आहे.

1 कोटी कुटुंबांना सोलर यंत्रणा देऊन 300 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा संकल्प यात आहे. गरीब, चाळीत, झोपडपट्टीत राहणारे, मध्यमवर्गीय यांना स्वत:चं घर घेण्यासाठी योजना तयार करण्यात येणार आहे. 1 लाख कोटींचा व्याजमुक्त निधी तयार करुन युवांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय तर अतिशय क्रांतिकारी आहे. यातून आमचे युवा हे मोठ्या प्रमाणात उद्यमी होतील. यातून संशोधनाला आणि स्टार्टअप इकोसिस्टीमला मोठी चालना मिळेल.‘लखपती दिदी’ या कार्यक्रमातून 3 कोटी भगिनींना लखपती बनविण्याचा संकल्प सुद्धा करण्यात आला आहे. 9 कोटी महिलांना महिला बचत गटांच्या माध्यमातून अर्थकारणाच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न आहे. 11 लाख कोटींची गुंतवणूक रस्ते, रेल्वे, पायाभूत सुविधांसाठी करण्यात येते आहे.

यातून विकासाला मोठी चालना मिळेल. या गुंतवणुकीतून एकिकडे पायाभूत सुविधा निर्माण होत असताना रोजगारात सुद्धा वृद्धी होणार आहे. शेतकर्‍यांसाठी नॅनो डीएपी ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. शेतकर्‍यांच्या शेतमालाला भाव आणि थेट बाजारपेठेशी जोडणी यासाठीच्या विविध योजनांचा ऊहापोह या अंतरिम अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. विकासाची दिशा सांगणारा पण त्याचवेळी आर्थिक शिस्त पाळणारा असा हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. एकंदरीत विकसित भारताचा रोडमॅप पूर्णकालीन अर्थसंकल्पातून पुढे येईल, हा आत्मविश्वास देणारा अर्थसंकल्प आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

व्हेज पनीर शाश्लिक सिझलर | Veg Paneer Shashlik Sizzler Recipe | Shankhnaad News