शाळकरी मुलांमध्‍ये विज्ञानाप्रती वाढती ‘जिज्ञासा’

0

– प्रयोगशाळा प्रशिक्षण कार्यक्रमाची 500 विद्यार्थी देणार प्रवेश परीक्षा
– पहिल्‍या दिवशी उत्‍तम प्रतिसाद, प्रा. राजेंद्र सिंग सायन्‍स एक्‍सप्‍लोरेटरीचा उपक्रम

प्रा. राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरी (पीआरएसएसइ) तर्फे आयोजित करण्‍यात आलेल्‍या प्रयोगशाळा प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या प्रवेश परीक्षेसाठी नागपुरातील विविध शाळातील 500 विद्यार्थ्‍यांनी नोंदणी केली असून आज, शुक्रवारपासून या प्रवेश परीक्षेला प्रारंभ झाला. पहिल्‍याच दिवशी वर्ग 5 ते 7 च्‍या 120 विद्यार्थ्‍यांनी जीवशास्‍त्र, रसानशास्‍त्र व भौतिकशास्‍त्राचे विविध प्रयोगकरीत विज्ञानाप्रतीची आपली ‘जिज्ञासा’ प्रकट केली.

विज्ञान, तंत्रज्ञानाची विद्यार्थ्‍यांमध्‍ये आवड निर्माण व्‍हावी, त्‍यांना विविध राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय स्‍पर्धांसाठी तयार करण्‍याच्‍या उद्देशाने प्रा. राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरी (पीआरएसएसइ) तर्फे आगामी शैक्षणिक सत्र जून 2024 ते मार्च 2025 साठी ही प्रवेश परीक्षा शंकर नगर येथे पीआरएसएसईच्‍या प्रयोगशाळेत घेण्‍यात आली.

या परीक्षेसाठी इयत्‍ता पाचवी ते सातवीच्‍या 500 विद्यार्थ्‍यांनी नोंदणी केली असून 30 व 31 मार्च रोजी या प्रवेश परीक्षेचा दुसरा व तिसरा टप्‍पा होणार आहे. या परीक्षेदरम्‍यान मुलांनी जीवशास्‍त्र, भौतिकशास्‍त्र व रसायनशास्‍त्राची प्रा‍त्‍यक्षिक व लेखी परीक्षा घेण्‍यात आली. शिवाय, प्रा. राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरी (पीआरएसएसइ) च्‍या संचालक डॉ. सीमा उबाळे यांनी विद्यार्थ्‍यांच्‍या पालकांना मार्गदर्शन केले.

या प्रवेश परीक्षेतून 400 विद्यार्थ्यांना या वर्षभर चालणाऱ्या सर्वसमावेशक प्रशिक्षणासाठी निवडण्‍यात येणार असून परीक्षेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पूर्ण शिष्यवृत्ती व सवलतदेखील दिली जाणार आहे. याशिवाय, विद्यार्थी विज्ञान मंथन, होमी भाभा बालवैज्ञानिक स्‍पर्धा, ज्‍युनिअर सायन्‍स ऑलिम्पियाड, इन्‍स्‍पायर सारख्‍या विविध राष्‍ट्रीय-आंतराष्‍ट्रीय स्‍पर्धांसाठी मार्गदर्शनदेखील करण्‍यात येणार आहे.