
नागपूर: राजकारणात कार्य करताना केवळ सत्तेपुरते किंवा पदापुरतेच नव्हे, तर माणुसकीच्या आणि विचारांच्या नात्यांनाही महत्त्व द्यावे लागते. राजकीय जीवनात एक विचारधारा घेऊन चालावे, मात्र त्याही पलीकडे जाऊन लोकांशी स्नेहपूर्ण संबंध जोपासले पाहिजेत, असे प्रतिपादन माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी केले.माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सहस्रचंद्र दर्शन व तुलादान सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अनेक मान्यवर, कार्यकर्ते, नातेवाईक व विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या.रमेशचंद्र बंग यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय व सामाजिक वाटचालीचा आढावा घेताना सांगितले की, राजकारणात काम करत असताना सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. सत्ता किंवा पद हे कायमस्वरूपी नसते; मात्र जनतेशी निर्माण झालेले नाते आणि विश्वास टिकाऊ असतात. त्यामुळे राजकीय जीवनात माणुसकी जपणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.ते पुढे म्हणाले की, हिंंगणा भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच शिक्षण संस्था, रस्ते, पाणीपुरवठा व अन्य मूलभूत सुविधांसाठी आपण सातत्याने प्रयत्न केले. मंत्रीपदाच्या काळात विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवून काम करताना विद्यार्थ्यांचे हित, शेतकरी, मजूर आणि सर्वसामान्य नागरिक यांचा विचार केंद्रस्थानी ठेवला, असेही त्यांनी नमूद केले.या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रमेशचंद्र बंग यांच्या सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक कार्याचा गौरव केला. त्यांच्या कार्यकाळात आदिवासी भागातील जमिनींचे पट्टे, पायाभूत सुविधा आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी भरीव काम झाल्याचे गडकरी यांनी सांगितले.या सोहळ्यास रमेशचंद्र बंग, सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, महेश बंग, दिनेश बंग, जयप्रकाश गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या दीर्घायुष्य व निरोगी आरोग्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.




















