
नगराध्यक्षपदी अरूण धोटे तर 21 पैकी 17 नगरसेवक विजयी
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वाचा दणदणीत विजय.
राजुरा (ता.प्र.) :— राजुरा नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस व शेतकरी संघटना आणि मित्र पक्ष यांच्या पुढाकाराने स्थापित नगर विकास आघाडीने दणदणीत विजय मिळवत सत्ता आपल्या हाती घेतली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नगर विकास आघाडीचे उमेदवार अरुण रामचंद्र धोटे यांनी 9011 मते मिळवत भाजपचे राधेश्याम लक्ष्मी नारायण अडाणीया (6278 मते) यांचा तब्बल 2733 मतांनी पराभव केला. नगर विकास आघाडीचे मुख्य सुत्रधार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वाचा हा दणदणीत विजय माणल्या जात असून आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही आघाडीने बहुसंख्य प्रभागांत नगर विकास आघाडीला विजय मिळवला असून प्रभाग क्रमांक 1 मध्ये स्वप्निल मोहुर्ले, प्रभाग 2 मध्ये सिद्धार्थ पथाडे व मंगला मोकडे, प्रभाग 3 मध्ये पौर्णिमा सोयाम व गोलू ठाकरे, प्रभाग 4 मध्ये नीता बानकर, प्रभाग 5 मध्ये फरीना शेख, प्रभाग 6 मध्ये इंदुताई निकोडे व प्रभाकर नळे, प्रभाग 7 मध्ये पूनम गिरसावडे, प्रभाग 8 मध्ये वज्रमाला बतकमवार व दिलीप डेरकर, प्रभाग 9 मध्ये अनंता ताजने, संध्या चांदेकर व अनु हर्जितसिंग संधू, प्रभाग क्रमांक 10 मध्ये गीता पथाडे यांनी विजय मिळवत नगर विकास आघाडीची ताकद अधोरेखित केली. तर प्रभाग क्रमांक १० मध्ये अपक्ष उमेदवार जुबेर शेख यांना ईश्वर चिठ्ठीद्वारे विजय घोषित करण्यात आले असून त्यांनी नगर विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. असे नगर विकास आघाडीचे एकुण 17 नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 1 मध्ये मयुरी पहानपटे, प्रभाग 4 मध्ये अमोल चिल्लावार, प्रभाग 5 मध्ये भूपेश मेश्राम, प्रभाग 6 मध्ये प्रफुल कावळे यांनी विजय मिळविला आहे. भाजपचे एकूण 4 नगरसेवक विजयी झाले आहेत.
या निकालानंतर राजुरा शहरात काँग्रेस आणि शेतकरी संघटना तथा मित्र पक्षाच्या नगर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला असून जनतेने दिलेल्या कौलाचा सन्मान ठेवत शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा निर्धार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे आणि शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड वामनराव चटप, नवनिर्वाचित नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे तसेच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.



















