Home LOCAL NEWS १३ व्या रुग्ण सेवा साहित्य केंद्राचे उद्घाटन …

१३ व्या रुग्ण सेवा साहित्य केंद्राचे उद्घाटन …

0

सेवाभावी जोडप्याचा अनोखा संकल्प

चंद्रपूर : दि. १९ डिसेंबर २०२५ :समाजसेवेची भावना केवळ शब्दांत न राहता कृतीतून साकार व्हावी, याचे प्रेरणादायी उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यात पाहायला मिळाले. सेवाभावी वृत्तीने समाजासाठी सातत्याने कार्यरत असलेले श्री अविनाश गुमुलवार व सौ. अर्चना गुमुलवार या आदर्श दाम्पत्याने आपल्या जन्मगावी स्व. श्रीमती कमलाबाई कुशाबराव गुमुलवार रुग्ण सेवा साहित्य केंद्र, अहेरी समाजाला दिनांक १९/१२/२०२५ रोजी चंद्रपूर येथे सेवा समितीच्या इमारतीत झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात अर्पण केले. हे केंद्र डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती, चंद्रपूर अंतर्गत सुरू झालेले १३ वे रुग्ण सेवा साहित्य केंद्र आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या मंगलप्रसंगी वैयक्तिक आनंदापेक्षा समाजहिताला प्राधान्य देत गरजू, दुर्बल व आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्णांसाठी हा सेवा प्रकल्प सुरू करण्यात आला. या केंद्रातून व्हीलचेअर, वॉकर, काठी, बेड आदी रुग्णोपयोगी साहित्य मोफत अथवा अल्प शुल्कात उपलब्ध करून देण्यात येणार असून, हा उपक्रम मानवतेच्या सेवेचा आदर्श ठरणार आहे.
१९८९ पासून पूर्व विदर्भात सामाजिक कार्यरत असलेली डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती “नर सेवा ही नारायण सेवा” या ब्रीदवाक्याला अनुसरून शिक्षण, आरोग्य व स्वावलंबन या तीन प्रमुख क्षेत्रांत कार्य करत आहे. संस्थेमार्फत चंद्रपूर, मुलचेरा, कोरची व एटापल्ली येथे पाच छात्रावास चालविले जात असून, आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व निवास सुविधा दिली जाते.
आरोग्य क्षेत्रात संस्थेची दोन चलचिकित्सालये गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात १९८९ पासून नियमित सेवा देत आहेत. दर आठवड्याला अनेक गावांमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी केली जाते. सध्या सुमारे ८६ गावांतील ग्रामस्थांना या सेवांचा लाभ मिळत असून २१ आरोग्य रक्षक व रक्षिका समर्पित भावनेने कार्यरत आहेत. एटापल्ली तालुक्यातील पेठा गावात  मागील २४ वर्षांपासून सुरू असलेला साप्ताहिक दवाखाना वनवासी बांधवांसाठी महत्त्वाचा आधार ठरत आहे.
यासोबतच संस्थेअंतर्गत रोगनिदान शिबिरे, प्रयोगशाळा, रुग्णवाहिका  सेवा, १२ रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्रे, वाचनालये, संस्कार केंद्र, हस्तकला प्रशिक्षण, अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे कार्यरत आहेत व पुढे ८ नवीन रुग्ण सेवा साहित्य केंद्र सुरू करण्याचा सेवा समितीचा मानस आहे अशी माहिती संस्थेचे सचिव ॲड. आशिष धर्मपुरीवार यांनी दिली.
या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री दिनदयालजी कावरे, विभाग प्रचारक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उपस्थित होते. त्यांनी समाजाने सेवाभावी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा व समाजाला काहीतरी देण्याची भावना जोपासावी, असे आवाहन केले.
याप्रसंगी ज्योतीताई गुमुलवार यांनी या कार्यक्रमाची प्रेरणा घेत त्यांच्यातर्फे एक रुग्ण सेवा साहित्य केंद्राला लागणारी आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले.
मंचावर श्री अविनाश गुमुलवार, सौ. गुमुलवार व ज्योतीताई गुमुलवार उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सुजित डाकूआ यांनी केले. या प्रेरणादायी कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
सेवाभावी वृत्ती, सामाजिक जाणीव व निःस्वार्थ समर्पण यांचा संगम असलेला हा उपक्रम अधिकाधिक विस्तारावा आणि त्यातून समाजातील अनेकांचे जीवन सुकर व्हावे, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.