नागपुरातील पारडी, कामठी या मेट्रोच्या नव्या सेवेचे लोकार्पण, नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचा शुभारंभ
नागपूर- बिलासपुर वंदे भारत एक्सप्रेसला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात हिरवी झेंडी दाखविण्याची शक्यता आहे. ही गाडी अवघ्या साडेपाच तासांत ४१२ किमीचे अंतर कापणार आहे. सर्व सुपरफास्ट गाड्या हे अंतर ६ ते ७ तासांत पूर्ण करतात. गोंदिया, दुर्ग, रायपूरला या गाडीचे थांबे असणार आहेत. नागपूर ते बिलासपूर ही देशातील सहावी वंदे भारत एक्सप्रेस असेल. शहरासाठी निश्चितच ही अभिमानाची बाब असणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतर्फे चालविल्या जाणाऱ्या या हाय-टेक ट्रेनबाबत बोलायचे झाल्यास ही गाडी शनिवार वगळता सर्व दिवस धावणार आहे. इतर पाच वंदे भारत गाड्या दिल्ली वाराणसी, दिल्ली-कटरा, मुंबई-अहमदाबाद, दिल्ली-चंडीगड आणि चेन्नई-म्हैसूर अशा आहेत. बिलासपूर येथून सकाळी 6:45 वाजता या गाडीचा प्रवास सुरू होईल आणि दुपारी 12:15 वाजता ती नागपुरात पोहोचेल. नागपूरहून ती दुपारी 2.05 वाजता सुरू होईल आणि 7:35 वाजता बिलासपूरला पोहोचेल. वंदे भारत गाड्या ताशी 130 किमी वेगाने धावतात. एसईसीआर नागपूर विभागाने नागपूर ते दुर्ग दरम्यानचा ट्रॅक आधीच अपग्रेड केल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
