Home Artical Blog ‘जीवनरंग’ नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘जीवनरंग’ नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

बालरंगभूमी परिषद व स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्था यांचे संयुक्त आयोजन

नागपूर(Nagpur), दि. 26 एप्रिल 2026:

बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखा आणि स्वर्गीय भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जीवनरंग’ या नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन महिला महाविद्यालय, नंदनवन येथे उत्साहात पार पडले. या शिबिराचा लाभ सुमारे १०० नागरिकांनी घेतला.

शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस उपस्थित होते. प्रमुख अतिथी नगरसेवक ॲड. निलेश गायधने, श्रीराम काळे व डॉ. श्रीरंग वराडपांडे तसेच ज्येष्ठ रंगकर्मी देवेंद्र दोडके, देवेंद्र लुटे आणि संजय वलीवकर यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजनाने करण्यात आली. मार्गदर्शनपर भाषणात श्रीराम काळे यांनी बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखेने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. देवेंद्र दोडके यांनी नागपूर शाखेने भविष्यात व्यावसायिक बालनाट्य उभारून त्याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर सादर करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. ॲड. निलेश गायधने यांनी आगामी उपक्रमांना नगरसेवक म्हणून कायम पाठबळ देण्याची ग्वाही दिली.

रवींद्र फडणवीस यांनी विविध संस्थांद्वारे कार्यशाळा व उपक्रम राबविण्याबाबत माहिती देत, बालरंगभूमी परिषदेने पुढाकार घेतल्यास त्यांच्या संस्थांमार्फत विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यास आनंद वाटेल, असे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैदेही चवरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखेचे अध्यक्ष श्याम आस्करकर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य किशोर डाऊ, रूपाली मोरे, अभिषेक बेल्लारवार, अमोल निंबार्ते, रोशन नंदवंशी, आसावरी तिडके, नरेश गडेकर, रवींद्र भुसारी, कल्याणी देव, अर्चना श्रावणे, योगेश राऊत, सुशील सरोदे, निलेश सोनटक्के, मिथुन हटवार, चिन्मय देशकर यांचे विशेष सहकार्य लाभले.