
नागपूर(Nagpur): सिकल सेल व थॅलेसिमिया हे अनुवांशिक विकार असून, त्याविषयी व्यापक जनजागृती आणि समुपदेशनाद्वारेच त्यांचे निर्मूलन शक्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
रा. स्व. संघ लोकसमस्या संशोधन व लोककल्याण समिती, नागपूर यांच्या वतीने शुक्रवारी द इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, नॉर्थ अंबाझरी रोड, नागपूर येथे पार पडलेल्या नागपुर ज़िल्हयाच्या सिकल सेल–थॅलेसिमिया विषयक कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी उपस्थित होते.
बावनकुळे पुढे म्हणाले की, सिकल सेल हा पारंपरिक अर्थाने आजार नसून अनुवांशिक दोष आहे. त्यामुळे याबाबत समुपदेशन, तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपक्रमांना विशेष महत्त्व आहे. २०४७ पर्यंत या विकारांचे निर्मूलन साध्य करण्यासाठी शासन व समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. आगामी पाच वर्षांत व्यापक जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपक्रम राबविल्यास या उद्दिष्टपूर्तीस मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यशाळेत सिकल सेल व थॅलेसिमिया विषयावर काम करणाऱ्या सामाजिक संस्था, शासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचारी, नामवंत डॉक्टर, तज्ज्ञ तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिल्या चर्चासत्राचे अध्यक्षस्थान डॉ. दिप्ती जैन यांनी भूषविले. या सत्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. मनीष तिवारी, डागा रुग्णालयाचे डॉ. संजय देशमुख, डॉ. रंजन सोलंकी, डॉ. रोशन मेंढे आणि यांनी मार्गदर्शन केले.
या सत्रा नंतर स्वतः सिकल सेल ग्रस्त असलेले डॉ. क्षितिज सूर्यवंशी व थॅलेसिमिया रुग्णाचे पालक श्री प्रकाश कुंटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
द्वितीय चर्चासत्राचे अध्यक्षस्थान डॉ. विजयकुमार तुंगार यांनी भूषविले. या सत्रात सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींनी अनुभव मांडले. यामध्ये डॉ. अनुराधा श्रीखंडे, डॉ. रुघवानी, गौतम डोंगरे, प्रिती शेंडे, डॉ. मिलिंद माने, डॉ प्रशांत अनसिंगकर, अशोक पत्की आणि श्रीमती रामटेके यांचा सहभाग होता.
शेवटच्या सत्रात जनकल्याण रक्तपेढीचे समन्वयक डॉ. आशुतोष काळे यांनी महाराष्ट्रातील रक्तपेढी व्यवस्थेबाबत माहिती दिली.
प्रास्ताविक श्री विनय आंबुलकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री मिलिंद पाठक यांनी केले.














