Home Artical Blog आमचा हीरो कोण, “हिडमा” की “वीर बाबुराव शेडमाके”?

आमचा हीरो कोण, “हिडमा” की “वीर बाबुराव शेडमाके”?

0

भामरागडमध्ये प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात पार पडला “जंगोम” नाटकाचा प्रयोग

नागपूर(Nagpur): “आमचा हीरो कोण.. आदिवासींचे दमन करणारा की आदिवासींचे उत्थान करणारा?” असा सवाल नाटकातून उपस्थित करण्यात आला. त्यावर उपस्थित प्रेक्षकांनी “वीर बाबुराव की जय” म्हणत आम्ही माओवादाच्या भ्रामक जंजाळातून बाहेर पडलो असल्याची पावती दिली.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागडच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात भगवंतराव आश्रम शाळेच्या पटांगणात रविवारी (२६ एप्रिल २०२६) महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने डॉ. दंदे फाऊंडेशन निर्मित आणि हेमेंदू रंगभूमी प्रस्तुत “जंगोम : वॉर अगेन्स्ट हिप्नोटिक इल्ल्युजन” या दोन अंकी मराठी नाटकाचा २१वा प्रयोग पार पडला. भामरागडवासीयांनी नाट्यप्रयोगाला उदंड प्रतिसाद दिला. नाटकात १८५७च्या इतिहासाचा मागोवा घेत वर्तमानातील माओवाद प्रवर्तक रक्तपाताचा धांडोळा विविध सत्य घटनांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. त्यात दंडकरण्याचा नायक वीर बाबुराव शेडमाके यांचा इतिहास मांडत त्यांनी जशी परकीय गुलामगिरी झटकून इंग्रजांविरोधात प्रखर लढा दिला होता. तसाच प्रखर लढा भारतीय संविधान हाती घेऊन वर्तमानातील माओवादाविरोधात देण्याची प्रेरणा या नाटकातून व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच माओवाद्यांच्या बटालीयन एकचा कमांडर माडवी हिडमा याच्या क्रौर्याचे चित्रण नाटकातून करण्यात आले आहे. माडवी हिडमा विकृत बुद्धीने कशा प्रकारे आदिवासींचा जीव घेत होता आणि त्याच्याच दिशानिर्देशानुसार आदिवासी महिलांची अब्रू लुटली जात होती, याची जाणीव नाटकातून करवून देण्यात आली आहे. आतापर्यंत सर्वात मोठा आदिवासी नरसंहार माडवी हिडमानेच घडवून आणल्याचे नाटकात पुराव्यानिशी सादर करण्यात आले आहे. या नाट्य प्रयोगबद्दल नरिकांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड आणि महाराष्ट्र पोलिसांचे अभारही व्यक्त केले.
नाटकाचे लेखन प्रवीण खापरे यांचे तर दिग्दर्शन शुभम निकम यांचे होते. व्यवस्थापन अजिंक्य थेर यांनी सांभाळले. नाटकात वीर बाबुरावच्या भूमिकेत अनुप बहाड यांची भूमिका होती. भुरीया भूमकालच्या भूमिकेत मयूर मस्के, नक्षलच्या भूमिकेत शुभम निकम यांच्यासोबत धनश्री, शुभम गुरनुले, कृष्णा मस्के, करुणा मंगदे, सतीश बगडे आदींच्या भूमिका होत्या.