Home LOCAL NEWS गडचिरोलीच्या कृषी क्षेत्राचा सन्मान : कल्पना ठाकरे यांना “तिफण गौरव पुरस्कार 2025”

गडचिरोलीच्या कृषी क्षेत्राचा सन्मान : कल्पना ठाकरे यांना “तिफण गौरव पुरस्कार 2025”

0

गडचिरोली(Gadchiroli): गडचिरोली जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वडसा (देसाईगंज) येथील सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती कल्पना बाळकृष्ण ठाकरे (खांडकुरे) यांना तिफण फाउंडेशनतर्फे आयोजित “तिफण कृषी गौरव सोहळा 2025” अंतर्गत प्रतिष्ठेचा “तिफण गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

कृषी विस्तार, फळबाग लागवड, कृषी यांत्रिकीकरण तसेच मृद व जलसंधारण या क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य अत्यंत प्रभावी व परिणामकारक ठरले आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित शेती पद्धती आणि विविध शासकीय योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचवून त्यांनी उत्पादनक्षमतेत लक्षणीय वाढ घडवून आणली. फळबाग विकास, यांत्रिकीकरणाचा प्रसार आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन यामध्येही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

शेतकरी मार्गदर्शन, प्रशिक्षण शिबिरे आणि पिक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून त्यांनी कृषी विकासाला गती दिली असून त्यांच्या कार्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसोबतच शाश्वत शेतीचा प्रसार झाला आहे. त्यांच्या या समाजाभिमुख कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार पुणे येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित सोहळ्यात महाराष्ट्राचे कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय (मामा) भरणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मा.प्रा. डॉ. दिगंबर दुगडि, अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मा. श्री. सुरज मांढरे (भाप्रसे), आयुक्त (कृषी), महाराष्ट्र राज्य

मा.श्री. रमेश जाधव कार्यकारी संपादक, अॅग्रोवन

मा.श्री. अंकुश माने संचालक कृषी (अभियांत्रिकी)

मा.श्री. दत्तात्रय गावसाने विभागीय कृषी सहसंचालक, पुणे

मा.श्री. रफिक नाईकवाडी संचालक कृषी (विस्तार व प्रशिक्षण)

मा.श्री. विनयकुमार आवटे संचालक कृषी (प्रक्रिया व नियोजन)

मा.श्री. सुनील बोरकर संचालक कृषी (निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण)
याबरोबरच कृषी व सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारताना श्रीमती ठाकरे म्हणाल्या की, “हा सन्मान केवळ माझा नसून गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण कृषी विभाग आणि शेतकरी बांधवांचा आहे. माझ्या कार्याला प्रेरणा देणाऱ्या प्रत्येक शेतकरी राजाला मी हा पुरस्कार समर्पित करते. ‘आता नाही तर कधीच नाही’ या भूमिकेतून पुढेही शेतकऱ्यांसाठी कार्य करत राहीन.”
तसेच त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई, कुटुंबीय, वरिष्ठ अधिकारी आणि शेतकरी वर्गाला दिले. “अमर्याद क्षेत्रात मर्यादित काम करण्यापेक्षा, मर्यादित क्षेत्रात अमर्यादित काम केल्यासच जीवन सुंदर होते,” असेही त्यांनी नमूद केले.