
जास्तीत जास्त शाळांनी सहभागी होण्याचे आवाहन
बाल कला अकादमी आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचा पुढाकार
नागपूर(Nagpur), ता. 28:
केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या प्रेरणेने मागील चार वर्षांपासून नागपूरमध्ये महानगरस्तरीय आंतरशालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेला यावर्षी राज्यस्तरीय स्वरूप देण्यात आले असून “राज्यस्तरीय खासदार चषक आंतरशालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा” आयोजित करण्यात येत असल्याची माहिती सौ मधुरा सारंग गडकरी (अध्यक्ष, बालकला अकादमी नागपूर) आणि श्री रवींद्र फडणवीस (अध्यक्ष, श्री शिक्षण प्रसारक मंडळ नागपूर) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी सौ मधुरा गडकरी यांनी केले. स्पर्धेबाबत माहिती देताना आयोजक म्हणाले कि, ही स्पर्धा दोन गटांमध्ये इयत्ता १ ते ५ (गट अ) आणि इयत्ता ६ ते १० (गट ब) आयोजित करण्यात येणार असून प्रत्येक गटात किमान १० व कमाल १५ स्पर्धकांचा समावेश असणे अनिवार्य आहे. प्रत्येक समूहाने दोन देशभक्तीपर गीते सादर करणे अनिवार्य राहील आणि ती गीते मराठी किंवा हिंदी भाषेत असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आयोजन समितीने निवडलेल्या गीतांपैकीच गीते सादर करावी लागतील.
स्पर्धेसाठी ५०० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्याबाहेरील स्पर्धकांना प्राथमिक फेरीसाठी ५००० रुपये प्रवास भत्ता देण्यात येईल, तसेच निवास व भोजनाची सोय आयोजकांकडून केली जाणार आहे. प्राथमिक फेरीतून प्रत्येक गटातील १० समूह अंतिम फेरीसाठी निवडले जातील. अंतिम फेरीसाठी बाहेरील चमूंना १०,००० रुपये प्रवास भत्ता देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही निवास व भोजनाची व्यवस्था केली जाईल.

सहभागी प्रत्येक चमूला प्रशस्तीपत्र देण्यात येईल. अंतिम फेरीतील विजेत्या चमूतील प्रत्येक स्पर्धकाला रोख पारितोषिक देण्यात येईल तसेच विजेत्या चमूला “खासदार चषक” प्रदान करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ नागपूर यांच्या बँक खात्यात प्रवेश शुल्क भरल्यानंतर नोंदणी पूर्ण केली जाईल.
गट अ (इयत्ता १ ते ५) साठी प्राथमिक फेरी ३ ऑगस्ट २०२६ रोजी, तर गट ब (इयत्ता ६ ते १०) साठी ४ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे. अंतिम फेरी व बक्षीस वितरण समारंभ १६ ऑगस्ट २०२६ रोजी वसंतराव देशपांडे सभागृह येथे पार पडणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 15 जुलै 2026 पर्यंत प्रवेश स्वीकारले जातील.
ही स्पर्धा बालकला अकादमी नागपूर आणि स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली असून अधिक माहितीसाठी सौ. मीनल बाविस्कर (मो. 8482874505) व सौ. प्रिया आत्राम (मो. 7020714385) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.















