विदर्भाला कर्तृत्‍ववान महिलांची परंपरा – कांचनताई गडकरी

0

विदर्भ साहित्‍य संघात रंगला ‘उत्सव साहित्याचा’

जागतिक महिला दिनानिमित्‍त विशेष आयोजन

नागपूर (Nagpur): 9 मार्चराजकीय, सामाजिक, साहित्यिक, इतिहास, सांस्‍कृतिक, उद्योग अशा विविध क्षेत्रांचा आढावा घेतला तर विदर्भाला कर्तृत्ववान महिलांची परंपराच लाभली असल्‍याचे लक्षत येते. महिलांना प्रोत्साहन मिळाले तर त्या स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या राहून समाजात मानसन्मान मिळवू शकतात, हे लक्षात येते, असे प्रतिपादन संस्कार भारतीच्या अध्यक्षा, तसेच प्रसिद्ध उद्योजिका, समाजसेविका कांचनताई गडकरी यांनी केले.
विदर्भ साहित्य संघ, साहित्य विहार संस्था, अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था आणि पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी ‘उत्सव साहित्याचा’ हा अभिनव कार्यक्रम अमेय दालनात पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाला धरमपेठ महिला बँकेच्या अध्यक्ष निलिमा बावणे, ज्‍येष्‍ठ साहित्यिक आशा पांडे, शुभांगी भडभडे, स्वाती सुरंगळीकर, वि.सा. संघाचे सरचिटणीस विलास मानेकर आणि विवेक अलोणी यांची मंचावर उपस्थित होती. यावेळी आशा पांडे व शुभांगी भडभडे यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्‍कार करण्यात आला.
कांचनताईंनी मराठीला अभिजात मराठीचा दर्जा मिळाल्‍याबद्दल समाधान व्‍यक्‍त करतान साहित्यिकांनी मराठीचे महत्त्व टिकविण्याकरिता प्रयत्न करायला हवे, असे प्रतिपादन केले. नवनवे उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवले तर आपली मराठी भाषा उन्नत व्हायला वेळ लागणार नाही, असे त्‍या म्‍हणाल्‍या.
निलिमा बावणे यांनी लेखिकांचे लिखाण समाजाशी निगडित असते. अनेक गोष्टी कथा, नाटकांमधून सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम लेखिका करतात, असे उद्गार काढले. यत्र नार्यस्त पूज्यन्ते ही आपली संस्कृती असून स्त्री, जननी, माता, आई, ललना, रमणी, महिला अशा स्त्रीच्या विविध रूपांमध्‍ये दिसते. ही तिची रूपे आपल्याला जपायचे असून समाजाला हितकारक दृष्टी द्यायची आहे, असे आशा पांडे म्‍हणाल्‍या.
या कार्यक्रमात स्वाती सुरंगळीकर, डॉ. ज्योत्स्ना कदम, प्रभा देऊस्‍कर, अंजली दुरुगकर, वृषाली देशपांडे, डॉ. अंजली पारनंदीवार, डॉ. वर्षा सगदेव, डॉ. प्रगती वाघमारे, मयुरी टोंगळे, ऐश्वर्या डोरले, मेघा देशपांडे, मंथन उकुंडे यांनी कविता, कथाकथन, अभिवाचन आदींचे सादरीकरण केले. दोन सत्रात झालेल्‍या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंजली भांडारकर व डॉ. मोनाली पोफरे यांनी तर आभार प्रदर्शन माधुरी वाडीभस्मे व सुजाता काळे यांनी केले.