
अनेक विषयाच्या संदर्भाने आयोगाचे उपाध्यक्ष अॅड, धर्मपाल मेश्राम यांनी बार्टीचे महासंचालक यांना दिले निर्देश
मुंबई (mumbai) दि. ०५.०३.२०२५ रोजी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबई येथील कार्यालयातील आयोगाचे उपाध्यक्ष यांचे दालनामध्ये बार्टी, पुणे यांची आढावा बैठक घेण्यातआली. बैठकीची अध्यक्षता आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी केली. अनेक विषयाच्या अनुषंगाने बार्टीच्या कामकाजात सुधारणा होणे व सर्वसामान्यांना न्याय देण्याच्या शासन भूमिकेचे कठोर पालन करावे, असे निर्देश बार्टीचे महासंचालक श्री. सुनील वारे व उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
दि. ०५.०३.२०२५ रोजी झालेल्या बैठकीमध्ये बार्टीचे महासंचालक यांचेसह आयोगाचे सदस्य सचिव श्री. संजय कमलाकर, आयोगाचे वरिष्ठ संशोधन अधिकारी उपस्थित होते. तसेच बार्टीच्या वतीने श्रीमती स्नेहल भोसले, विभाग प्रमुख (योजना), श्रीमती व्वाली शिंदे, विभाग प्रमुख (संशोधन) व श्री. रविंद्र कदम, श्री. दादासाहेब गिते, श्री. उमेश सोनवणे असे विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
दि. १४ ऑक्टोबर, २०२४ रोजी बार्टीच्या माध्यमातून नागपूर येथील दीक्षा भूमीवर जवळपास ४००० पुस्तकांचे वितरण केले गेले. सदर पुस्तकांची विषय सूची कोणी ठरविली या विषयावर बार्टीचे निबंधक श्रीमती इंदिरा आस्वार यांनी दि. १७.१०.२०१४ रोजीच्या नियामक मंडळाच्या बैठकीतील इतिवृत्तानुसार व त्यातील उप समितीच्या सूचनेनुसार ही विषय सूची ठरविल्याचे सांगितले. त्यावर आश्चर्य व्यक्त करत सन २०१४ ते २०२४ या कालावधीमध्ये अशा पध्दतीच्या नियामक मंडळाच्या बैठका का घेण्यात आल्या नाहीत? याचे स्पष्टीकरण व दि. १७.१०.२०१४ च्या बैठकीचे इतिवृत्त बार्टीला मागविण्यात आले.
सन २००४-२०१७ व २०१७-२०२१ या आर्थिक वर्षातील महालेखाकार, मुंबई यांनी केलेल्या लेखापरिक्षणातील आक्षेपांच्या संदर्भाने बार्टीने केलेल्या अनुवृत्ती पालन अहवाल अद्यापही स्वीकारला नाही. त्यावर बोट ठेवत आताच्या बार्टीचे लेखाधिकारी श्रीमती योगिता झनपुरे यांनी स्वतःच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह तपशिलवार अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले.
बार्टीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या IBPS, रेल्वे इत्यादी परिक्षांचे अनिवासी पूर्व प्रशिक्षण, निवासी पूर्व प्रशिक्षण, एम.पी.एस.सी. परीक्षा पूर्व प्रशिक्षण, एम.पी.एस.सी. मुख्य परीक्षा आर्थिक सहाय्य, एम.पी.एस.सी. राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणी परिक्षा आर्थिक सहाय्य, एम.पी.एस.सी. अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा आर्थिक सहाय्य, एम.पी.एस.सी. अन्न व औषध प्रशासन व व निरीक्षक वैधमापन मुख्य परीक्षा आर्थिक सहाय्य, एम.पी.एस.सी. न्यायिक मुख्य परीक्षा आर्थिक सहाय्य, युपीएससी च्या पूर्व प्रशिक्षण व यु.पी.एस.सी. चे प्रशिक्षण देणाऱ्या दिल्ली व इतर शहरातील संस्थांची निवड प्रक्रिया, निवड झालेल्या संस्थांची आकस्मिक भेट व निरीक्षण अहवाल अशा संदर्भाने सविस्तर चर्चा करुन ही सर्व प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने राबवावी व प्रशिक्षणासाठी निवडण्यात आलेल्या संस्थेची नियमित निरीक्षण अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश आयोगाचे उपाध्यक्ष मा. अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड, जि. रायगड येथील देखभाल व व्यवस्थापनाचा खर्च ६ करोड निधी खर्च करण्यात आला. तपशिलवार माहिती बार्टीचे महासंचालक श्री. सुनील वारे यांनी आयोगास सादर करावी, असे निर्देश दिले.
बार्टीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या व सर्व योजनांची सामाजिक अंकेक्षण करण्यात यावे, परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी IELTS व TOEFL परिक्षांचे मोफत कोचिंग व मार्गदर्शन केंद्र सुरू करावे, अॅट्रॉसिटी अॅक्टच्या संदर्भाने अधिकाऱ्यांची कार्यशाळा जिल्हानिहाय आयोजित करण्यात यावी, ग्रामीण भागात प्रायोगिक तत्वावर मोफत अभ्यासिका सुरू करण्यात यावी, अशा पध्दतीच्या सूचना देखील आयोगाचे उपाध्यक्ष मा. धर्मपाल मेश्राम यांनी केल्या आहेत.