
वसंत साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगीतमय श्रध्दांजली
नागपूर (Nagpur), 4 मार्च
मेवाती घराण्याचे प्रतिभावान हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पं. संजीव अभ्यंकर यांच्या अत्यंत अभिरुचीसंपन्न गायन मैफिलिने रसिकजन तृप्त झाले. वसंत साठे परिवार, मित्र, हितचिंतक व सप्तकतर्फे राष्ट्रप्रेमी, मुत्सद्दी व बहुआयामी व्यक्तीमत्वाचे धनी असलेले श्री वसंत साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आज, शनिवारी त्यांच्या संगीतमय श्रध्दांजलीचे आयोजन करण्यात आले होते. कवि कुलगुरु कालिदास सभागृह, पर्सिस्टंट सिस्टिम्स, गायत्रीनगर येथे ही सुश्राव्य मैफिल पार पडली.
पं. संजीव अभ्यंकर यांंनी राग गोरख कल्याण या अतिशय मधुर रागाने गायनाला सुरुवात केली. उत्तरोत्तर बहरत गेलेल्या मैफिलित त्यांनी लोकप्रिय राग मारु बिहाग सादर करीत श्रोत्यांचे मन जिंकले.
त्यांच्या एक एक स्वराचा, शब्दाचा नाद सभागृहात आनंद पसरवत गेला. दैवी आवाजाची देणगी असली तरी गाण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यात अध्यात्मिक बैठक असेल तर वेगळा ऑरा प्राप्त होतो, सूर हा नादाचा कोलाज असतो, असे पंडित अभ्यंकर म्हणाले. त्यांनी सुरांशी क्रीडा, सुरांची उत्स्फूर्त आराधना उदाहरणासह स्पष्ट केली.
सव्वातास गायलेल्या ख्याल गायन, मिश्र देस रागात होरीचे पद, संतरचना, अभंगरचनेने त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. वसंत साठे भारतीय बैठकीत विनम्रपणे मागे बसत, अशी माणसे राजकारणात कमी असतात, मला त्यांचे उदंड प्रेम लाभले, अशी ह्द्द आठवण पं. अभ्यंकर यांनी याप्रसंगी सांगितली.
कार्यक्रमाचे निवेदन वसंत साठे यांचे दीर्घकालिन निकटवर्ती अभय भावे यांनी केले. वसंत साठे अजूनही स्मृतीत जीवंत आहेत. वसंत ऋतुप्रमाणे आनंद आणि उर्जेची ते सतत पखरण करीत. त्यांनी उमलत्या कलाकारांना प्राधान्याने प्रोत्साहन दिले. कलारसिक, उत्तम वक्ते, वकील असलेले वसंत साठे यांना सृृजनशक्तीचा आदर होता, असे भावे म्हणाले. प्रास्ताविक डॉ. उदय गुप्ते यांनी केले. प्रारंभी कलाकारांचे स्वागत वसंत साठे यांचे सुपुत्र सुभाष साठे यांनी केले. हार्मोनियमवर अभिषेक शिनकर, तबला अजिंक्य जोशी, तानपुरा रुद्रप्रताप दुबे आणि अबोली देशपांडे, तालवाद्यावर गजानन रानडे यांनी साथ दिली.
.
बापूंचे नागपुरात स्मारक व्हावे : लता मुरुगकर
बहुआयामी, पराक्रमी, देदीप्यमान व्यक्तीमत्वाचे धनी असलेले बापू उर्फ वसंतराव साठे यांचा नागपूर व विदर्भाच्या विकासात मोठा वाटा असल्याने, त्यांचे नागपूर येथे स्मारक व्हावे, अशी इच्छा वसंत साठे यांच्या भगिनी लता मुरुगकर यांनी आठवणींना उजाळा देताना व्यक्त केली. वसंत साठे यांच्या जडणघडणीत उच्चशिक्षित आईवडील, सुजाण आप्त आणि स्वातंत्र्य चळवळीतील घटनांचा वाटा होता. नितीशास्त्रज्ञ, तत्वज्ञानी, मनमिळावू, घनिष्ट मैत्री करणारे, समर्पित, प्रसन्न व सहिष्णू वसंत साठे यांनी देशातील सांस्कृतिक वातावरण फुलवत ध्येयपुर्तीकडे वाटचाल केली, असे लता म्हणाल्यात.