बारावीचा निकाल 91.25 टक्के, पुन्हा मुलींचीच बाजी, नागपूर विभाग 90.35 टक्के

0

पुणेः राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा 91.25 टक्के म्हणजेच मागील वर्षीच्या तुलनेत २.९७ टक्क्यांनी कमी लागला (HSSC Result-2023) आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींचाच वरचष्मा दिसत असून कोकण विभाग 96.01 टक्के निकालासह अव्वल ठरला आहे. तर मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के असा सर्वात कमी आहे. नागपूर विभागाचा निकाल 90.35 टक्के तर अमरावती विभागाचा निकाल 92.75 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल दुपारी 2 वाजता ऑनलाइन पाहता येणार असल्याची माहिती, राज्य मंडळाकडून देण्यात आली आहे.

 

राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी, मार्च 2023 दरम्यान इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. १४लाख २८ हजार १९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 91.25 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.४३ टक्के इतके राहिले.

शाखानिहाय निकाल

शाखानिहाय निकालात सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा ९६.०९ टक्के लागला. त्या खालोखाल वाणिज्य विषयाचा निकाल ९०.४२ टक्के लागला तर कला विषयात ८४.०५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण ठरले. व्यवसाय अभ्यासक्रमांचा निकाल ८९.२५ टक्के राहिला.

मुलींची बाजी

दरवर्षी प्रमाणे निकालावर मुलींचा वरचष्मा राहिला. मुलींचा निकाल 93.73 टक्के तर मुलांचा निकाल 89.14 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा 4.59 टक्के अधिक लागला आहे. एकूण 154 विषयांपैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

विभाग निहाय निकालाची टक्केवारी

कोकण विभाग – 96.01 टक्के
मुंबई विभाग – 88.13 टक्के
पुणे विभाग – 93.34 टक्के
नागपूर विभाग – 90.35 टक्के
औरंगाबाद विभाग – 91.85टक्के
कोल्हापूर विभाग – 93.28 टक्के
अमरावती विभाग – 92.75 टक्के
नाशिक विभाग – 91.66 टक्के
लातूर विभाग – 90.37 टक्के