
-पाचव्या दिवशी ही विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संयुक्त कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वात आंदोलन
नागपूर(Nagpur),१८-५-२०२६: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर प्रचंड घोषणाबाजी करीत निषेधसभा आंदोलन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संयुक्त कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांचे आंदोलन पाचव्या दिवशी सोमवारी (५ मे २०२६) रोजी देखील सुरूच होते. दुसऱ्या टप्प्यात १८ ते २० मे दरम्यान धरणे आंदोलन, निषेध सभा आंदोलन केले जाणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संयुक्त कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी गुरुवार, दि. १४ मे २०२६ पासून काळ्याफिती लावून कामकाज आंदोलनास सुरुवात केली आहे. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी कर्मचाऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वारासमोर प्रचंड घोषणाबाजी करीत निषेधसभा आंदोलन केले. विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष दिसून आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संयुक्त कर्मचारी कृती समितीने केलेल्या आवाहनाला जमनालाल बजाज प्रशासकीय परिसरातील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद देत आंदोलनात सहभाग घेतला आहे. हीच परिस्थिती विद्यापीठाच्या सर्व विभागांमध्ये दिसून आली.
महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमध्ये कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य विद्यापीठे व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांमार्फत शासन स्तरावर वेळोवेळी निवेदने सादर करण्यात आलेली आहे. मात्र, अद्यापपर्यंत सदर मागण्यांवर शासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. सदर बाबीमुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यांच्या न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठे व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या दि. २७ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सातव्या वेतन आयोगानुसार १०,२० व ३० वर्षानंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करण्यात यावी. राज्य सार्वजनिक विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी. सन २००५ पूर्वी जाहिरात प्रक्रिया पूर्ण होऊन सन २००५ नंतर नियुक्ती प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देय असलेले रजा रोखीकरण सातव्या वेतन आयोगानुसार अंतिम वेतनाच्या आधारे अदा करण्यात यावे. शिक्षक भरती प्रमाणेच अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयातील रिक्त शिक्षकेतर पदे भरण्यास तत्काळ मंजुरी देण्यात यावी. विद्यापीठातील शैक्षणिक विभागातील प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर यांना रजा रोखीकरणाचे लाभ पूर्ववत सुरू करावे. १९८८-८९ पासून नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयात सरळ सेवेने मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक पदांवर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती प्रकरणे निकाली काढावी. न्याय प्रविष्ट नसलेल्या महाविद्यालयीन प्रयोगशाळा सहाय्यक यांची शासन निर्णय २२-९-२०२५ नुसार सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार ग्रेड पे २४०० नुसार वेतन निश्चिती करण्यात यावी. विद्यापीठातील नियमित शिक्षकेतर पद भरतीच्या अनुषंगाने सद्यस्थितीत मनुष्यबळाचा अभाव पाहता तसेच २०१३ पासून भरती बंदी असल्याने पदोन्नती प्रमाणामध्ये ५०:५० ऐवजी ८०:२० प्रमाणात मंजुरी देऊन ८० टक्केच्या प्रमाणात पदोन्नतीने पदे भरण्यास मान्यता देणे. थकीत डीसीपीएस वर्गणी कपात बंद करण्यात आली आहे. तसेच २०२३ पासून एनपीएस योजना अस्तित्वात आल्याने बंद करण्यात आलेल्या डीसीपीएस वर्गणी कपात पुन:श्च पूर्ववत सुरू करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन यावेळी कुलगुरूंना देण्यात आले. संयुक्त कृती समितीच्या निर्णयानुसार १४ मे २०२६ पासून टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जात आहे. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. दिनेश दखणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री. याकुब शेख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ बहुजन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर शेळके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिक्षकेतर सेवक संघाचे अध्यक्ष श्री. प्रभाकर धर्मारी, डॉ. चंद्रमणी सहारे, दर्पण गजभिये, धनुसिंग पवार, सचिन जांबुतकर, डॉ. नीता दखणे, दीपा कांबळे, स्मिता भोयर, शुभांगी गावंडे, मीना परतेकी, आनंद गटलेवार, जगदीश रमधम, राकेश कोपुलवार, गिरीश बडनखे, राजेंद्र भलावी, प्रवीण गोतमारे, अरुण हट्टेवार, मनोज इंगळे, धनंजय सुखदेवे, सूरज सुर्यवंशी, गौरव मसराम, विलास पंचम, विलास बनसोड, जोगेंद्र हरदास, मंगेश उताणे, जगदीश शेंदुरकर, राजेश शिरसुदे, राजू कुकडे, रितेश पुरकाम, नितीन पालकर, सचिन रामटेके, वासुदेव हरडे, प्रशांत वैद्य, मनोज धुर्वे, नितीन खरबडे, धम्मा धाबर्डे, विनोद माटे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
















