मुंबई
काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक व त्यांच्या फ्रेंच मैत्रिणीविरुद्ध बनावट व्हिसा प्रकरणात गुन्हा दाखल झाला (Son of Nawab Malik booked for Forgery) आहे. फराज मलिक यांनी व्हिसाच्या अर्जासोबत बनावट कागदपत्रे जोडल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे कुर्ला पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम 420, 465, 468, 471, 34 आणि विदेशी नागरिक कायदा 1946 च्या कलम 14 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 मार्च ते 23 जून 2022 कुर्ल्यामध्ये बनावट कागदपत्र तयार करण्यात आली होती. एका अधिकाऱ्याच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखीही काही आरोपींवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, हॅमलिन 2020 मध्ये भारतात आली होती. तिने व्हिसा मुदत वाढवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. पण, हा अर्ज दाखल करताना तिने अर्जासोबत बनावट कागदपत्र जोडली होती. फराज यांनी जी कागदपत्र दिली होती, त्यात मॅरेज सर्टिफिकेट बोगस असल्याचे समोर आले. मुंबई महानगर पालिकेचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाले आहे. एक वर्षांपूर्वीच कुर्ला पोलिसांना पडताळणीसाठी ते पाठवण्यात आले होते. मात्र तब्बल एक वर्षांपासून कुर्ला पोलिसांकडून फाईलवर कोणतीही कारवाई झाली नव्हती. अखेरीस आता गुन्हा दाखल झाला आहे. माजी मंत्री नवाब मलिक हे जवळपास वर्षभरापासून कारागृहात आहेत.