प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष, शरद पवारांची घोषणा

0

 

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यापुढे (NCP Working President) काम पाहणार आहेत. दोघांकडे देखील वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना ही घोषणा केली आहे.आगामी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी या दोघांवर असणार आहे. सध्या तरी अजित पवार यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.
गेल्याच महिन्यात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. दोन दिवसानंतर पवार यांनी राजीनामा मागे घेताना पक्षात आपले उत्तराधिकारी नेमणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. त्याप्रमाणे शरद पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नियुक्ती केल्या आहेत. दरम्यान या नियुक्त्यानंतर राष्ट्रवादीतील अजित पवार गटाची नेमकी काय भूमिका असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. अद्याप या गटाकडून कोणाचीही प्रतिक्रिया आलेली नाही