बुलढाणा : खामगाव शहरातील बुलेटस्वारानो सावधान…बुलेट ही शानदार सवारी असली तरी, आता फटाके फोडल्यासारखे आवाज करत गेलात, तर कारवाई होणार आहे. कानठळ्या बसवणारा आवाज काढणाऱ्या बुलेट विरोधात शहर पोलिसांनी मोहीम हाती घेतलीय. बुलेट चालकाला किंवा मालकाला कारवाईला सामोरं जावं लागणार आहेच. पण त्याचबरोबर गॅरेज मालकांवर देखील कारवाई होणार आहे. कारण, बुलेटचा मूळ सायलेन्सरचा आवाज मोठा नसतो. त्यात, बदल करून असा मोठा आवाज करणारे सायलेन्सर बसवले जातात. त्यामुळं बुलेटचे सायलेन्सर बदलणाऱ्या गॅरेजवरही कारवाई होणार आहे.बुलेट चालकांनो सायलेन्सरमधून कर्कश्य आवाज काढून फिरणाऱ्या बुलेट चालकांवर खामगाव शहर पोलीस कारवाई करत आहेत. अगोदर केवळ बुलेटचा सायलेन्सर काढून घेतला जात होता. आता मात्र थेट ध्वनी प्रदूषण होत असल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर भरमसाठ आर्थिक दंड थोतावळ्या जात आहे. गेल्या महिन्याभरापासून बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई करत लाखोंचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सध्यादेखील ही कारवाई जोरात सुरू असून स्वतः यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी आणि ठाणेदार शांतीकुमार पाटील यांनी लक्ष घातले आहे. मागील काही दिवसांपासून बुलेट या दुचाकीचे सायलेन्सर बदलून वाहने चालवण्याचे प्रकार वाढले आहेत. एक फॅशन म्हणून दुचाकीचालक याकडे पाहतात, बुलेट राजा वाहतूक नियमांचे असे उल्लंघन करत असताना, एकूण शहराचे वाहतुकीचे नियम पाळण्यात बेशिस्त असल्याची आकडेवारी पुन्हा समोर आलीय. एकूणच वाहतुकीच्याबाबतीत हम नही सुधरेंगे, हा बाणा खामगावकरांनी कायमच ठेवलाय. त्यामुळे आता कारवाईचा बडगा उगारल्याचे ठाणेदारांनी सांगितले.